कर्जत शहरात बाजारपेठ बंद
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे कोपर्डी येथे येणार असल्याने कर्जतमध्ये तणाव निर्माण होऊन त्यांच्या विरोधात बंदही पाळण्यात आला.
शनिवारी सकाळी ११ वाजता आठवले हे कोपर्डी येथे पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी येणार होते. तसा त्यांचा दौराही जाहीर झाला होता. त्यांच्यासाठी तालुक्यातील अंबालिका कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेल्या हेलीपॅडही उभारण्यात येणार होते. भारिपचे कार्यकर्तेही येथे सकाळपासूनच जमले होते. मात्र संभाजी ब्रिगेड, शिवप्रहार यांच्यासह अन्य संघटनांनी आठवले यांना कोपर्डीत येण्यास विरोध केला होता. या संघटनांचे कार्यकर्ते सकाळीच कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी चौकात जमले होते. मात्र पोलिसांनी शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर यांना कोपर्डीत जाण्यास प्रतिबंध केल्याने शहरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. जमलेल्या कार्यकर्त्यांनी लगेचच येथे जोरदार घोषणाबाजीही सुरू केली. काही वेळातच याचे लोण शहरात पसरून शहरातील दुकाने बंद झाली. मात्र परिस्थितीत गांभीर्य ओळखून अखेर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना कोपर्डी येथे जाण्यास परवानगी दिली. नंतर आठवले आता येणार नाहीत, ही माहितीही येथे आली. त्यानंतर हा तणाव निवळला व बाजारपेठही पुन्हा सुरू झाली. नंतर कोपर्डी येथे ग्रामस्थांसमोर बोलताना आढवले यांच्यासह दलित नेत्यांवर टीका करण्यात आली.
माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी कोपर्डी येथे पत्रकारांशी बोलताना दलित नेत्यांना येऊ द्यावे, अशीच आपली भूमिका असल्याचे सांगितले. ते म्हणाले, तसे आवाहनही आपण केले होते. दलित नेत्यांनाही त्यांच्या भावना मांडू द्या, आपणही आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडू, यातून मार्ग निघेल, अशी आपली भूमिका होती. मात्र त्याला यश आले नाही, असे धस म्हणाले.राजेंद्र गुंड, दादा सोनमाळी, नितीन धांडे, सुधीर जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

पीडित कुटुंबास अन्यत्र हलवले
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे कोपर्डी येथे येणार असल्याने पीडित कुटुंबीयांनी देखील त्यांना आम्हाला भेटायचे नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे या कुटुंबाला त्यांच्या वस्तीवरून गावात अन्यत्र हलविण्यात आले होते.