नवीन शेतकरी संघटना काढण्याच्या हालचाली सुरु केल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी राजू शेट्टींवर घणाघाती टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी यांची हुकूमशाही सुरू असून त्यांना माझ्याकडे असणारे मंत्रीपद खूपत आहे. पुण्यातून राजू शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नव्हे तर माझ्या विरोधात होती, असा आरोप त्यांनी सांगलीतील कार्यक्रमात केला.

सरकारमधून बाहेर पडण्यासाठी शेट्टी कोणता मुहूर्त पाहत आहेत, असा टोमणा देखील त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, माझी आमदारकी आणि मला मिळालेलं मंत्रीपद भाजपच्या कोट्यातून आहे. त्यामुळे माझ्या मंत्रीपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त भाजपला आहे. लायकी असेल तर राजू शेट्टींनी माढा मतदारसंघात उमेदवार देऊन एक लाख मते घेऊन दाखवावीत, असे आव्हान खोत यांनी यावेळी दिले. शेट्टींनी हे आव्हान पेलले तर राजकारण कायमचे सोडेन, असे देखील ते म्हणाले. राजू शेट्टी यांची ताकद फक्त हातकणंगले मतदार संघात आहे. या मतदार संघाशिवाय  मैदानात उतरले तर त्यांची खरी ताकद कळेल, असेही खोत म्हणाले.

त्यांच्या या विखारी टीकेनंतर राजू शेट्टी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. नवीन शेतकरी संघटना स्थापन करण्यासाठी खोत यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. बुधवारीच त्यांनी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यात संपर्क अभियान राबवले होते. दसऱ्याचा मुहूर्त साधत नवी संघटना स्थापन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी देखील त्यांनी राजू शेट्टींवर निशाणा साधला होता.