सातारा येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्याच्या दृष्टीने नगर पालिकेने पाऊल उचलले आहे. शहरातील तळी स्वच्छ रहावीत यासाठी कृत्रिम तळे निर्माण क रण्याचे काम हाती घेतले आहे. गोडोली, कोडोली, सदर बझार या भागातील गणेशमूर्तीचे विसर्जन या तलावात झाल्याने काही प्रमाणात प्रदूषणमुक्ती होणार आहे हे नक्की.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी पंधरा वर्षांपूर्वी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा ऊपक्रम सुरु केला होता, त्यात त्यांनी पीओपीच्या गणेश मूर्ती दान,प्लास्टिकचा कमीत कमी वापर ,शाडूच्या मूर्तीची स्थापना या सारख्या उपक्रमांना चालना देण्यात आली होती. महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकत्रे या उपक्रमात सहभागी होत असत. गेल्यावर्षीपासून या उपक्रमाला वेग आला होता. यावर्षी जिल्हाधिकारी डॉ.रामास्वामी यांनी सातारकरांना शाडूच्या मातीचे तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्याचे आवाहन केले होते. शहरातील मूर्तिकारांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पुढील वर्षी प्रत्येक घरात शाडूची गणेश मूर्ती देण्याचे आश्वासन दिले होते. या उपक्रमाला साद देत नगर पालिकेने कृत्रिम तलावाचे नियोजन गणेश विसर्जनासाठी केले आहे.गोडोली येथील नगर पालिकेच्या जागेत १५ फूट खोल आणि ५० फूट लांब आणि ७० फूट रूंदीचा तलाव तयार करण्यास सुरुवात केली आहे.या मध्ये सार्वजनिक तसेच घरगुती गणपती विसर्जनाची सोय करण्यात येणार आहे. शहरातील मोती तळे तसेच मंगळवार तळ्यात गणपती विसर्जनास बंदी केल्याने सातारकरांना पर्याय शोधावा लागणार होता. गोडोली येथील हा पर्याय या गणेशोत्सवात उपयोगास आला तर पुढील उत्सवात आणखी तलाव तयार केले जातील आणि प्रदूषित तळी काही प्रमाणात शुध्द राहतील.