लोकसभा निवडणुकीची चुरस ऐन रंगात आली असताना शनिवार व रविवारी कोल्हापूर जिल्हय़ात दिग्गजांचा दौरा होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. शनिवारी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच योगगुरू रामदेवबाबा यांच्या सभा होणार आहेत. तर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूर व इचलकरंजी येथे सभा होणार आहे.
कोल्हापूर जिल्हय़ातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत आघाडी व महायुतीच्या उमेदवारांत काटे की टक्कर होत आहे. आघाडीचे धनंजय महाडिक व कल्लाप्पाण्णा आवाडे आणि महायुतीचे संजय मंडलिक व खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी उभय पक्षांकडून मोठी ताकद लावली जात आहे. या आठवडय़ात प्रचाराचा धडाका उडाल्याने राजकीय वारे चांगलेच तापले आहे. मात्र आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजत राऊत, वस्त्रोद्योगमंत्री नसीम खान वगळता मोठय़ा सभा झाल्या नव्हत्या. शनिवारी व रविवारी मात्र दिग्गजांच्या सभा होत असल्याने उमेदवारांना वातावरण अनुकूल होण्यास त्याचा लाभ होणार असल्याचे दिसत आहे.    
शनिवारी उद्धव ठाकरे यांचे दुपारी चार वाजता येथील विमानतळावर आगमन होणार आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. त्यांची गांधी मैदान येथे सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे. ठाकरे हे साडेसात वाजण्याच्या सुमारास सभेला संबोधित करणार आहेत. रात्री त्यांचा मुक्काम करवीरनगरीत असून मंडलिक यांच्या प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची गोळाबेरीज त्यांच्याकडून होणार आहे. तर योगगुरू रामदेवबाबा यांची सायंकाळी ४.३० वाजता पेठवडगाव तर सायंकाळी साडेसहा वाजता येथील सासने मैदानात योगदीक्षा सभा होणार आहे. राजकीय पक्ष, उमेदवार यांचा नामोल्लेख न करता ते त्यांच्या अनुयायांना राजकीय संदेश देण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी उद्धव ठाकरे व रामदेवबाबा यांची संयुक्त पत्रकार परिषदही होणार आहे.    
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे रविवारी कोल्हापूर जिल्हय़ाच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता गांधी मैदान येथे सभा होणार आहे. तर सायंकाळी साडेसात वाजता इचलकरंजी येथील घोरपडे नाटय़गृह चौकात दुसरी जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, आमदार के. पी. पाटील यांनी दिली. या दौऱ्यात प्रचारातील कमतरता जाणून घेऊन उणिवा दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होणार असल्याचे सांगण्यात येते.