शीना बोरा हिचा मृतदेह पेणमध्ये जिथे फेकण्यात आला होता तेथून मुंबई पोलीसांच्या पथकाने शुक्रवारी हाडांचे १० ते १२ अवशेष ताब्यात घेतले. घटनास्थळावरूनच पोलीसांनी हे अवशेष ताब्यात घेतल्यामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई पोलीस आणि न्यायवैद्यक विभागाचे संयुक्त पथक शुक्रवारी सकाळीच पेणमधील गोगादे खुर्द येथील जंगलात गेले होते. पेण नगरपालिका कर्मचाऱयांच्या साह्याने गोगादे खुर्दमधील घटनास्थळी सुमारे पाच ते सहा तास खोदकाम करण्यात आले. तेथे हाडांचे काही अवशेष असल्याचे दिसल्यावर पोलीसांनी ते ताब्यात घेतले. शीनाची हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून याच ठिकाणी फेकण्यात आला होता. ही सुटकेसही आरोपींनी पेटवून दिली होती.
२४ एप्रिल २०१२ रोजी वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाजवळून शीनाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह पेणमध्ये फेकून दिल्यानंतर काही दिवसांनी तेथून दुर्गंधी येऊ लागली. गावकऱयांनी याबद्दल पोलीसांना माहिती दिल्यावर तेथून मृतदेहाचे काही अवशेष जप्त करण्यात आले. मात्र, मृतदेहाचा बराच भाग जळलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख त्यावेळी पटली नव्हती.
रायगड पोलीसांनी मे २०१२ मध्ये त्या मृतदेहाचे काही केस, दात आणि काही हाडे तपासणीसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविली होती. मात्र, तेवढ्यावरून संबंधित व्यक्तीचे वय, लिंग आणि मृत्यूचे कारण शोधता येणार नाही, असे पत्र जे. जे. रुग्णालयाने रायगड पोलीसांना पाठवले. रायगड पोलीसांनी त्याला काहीच उत्तर दिले नव्हते. जे. जे. रुग्णालयाकडे असलेले केस, दात आणि हाडांचे अवशेष मुंबई पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.