छत्रपती शिवाजीमहाराज जयंती गुरुवारी नगर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटना, शाळा, कॉलेजच्या सहभागातून आकर्षक मिरवणूकही काढण्यात आली. मिरवणुकीत विद्यार्थी, कार्यकर्त्यांनी खेळांचे डाव, कसरती सादर केल्या. शाहिरी पोवाडय़ातून शिवाजीमहाराजांच्या कार्याची महती सादर करण्यात आली.
जुने बसस्थानक चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळय़ाला पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुतळय़ाच्या परिसरास बुधवारी रात्रीच विद्युतरोषणाई करण्यात आली होती. महापौर, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, प्रांताधिकारी वामन कदम, युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे पदाधिकारी जी. डी. खानदेशे, रामनाथ वाघ, नंदुकमार झावरे आदी या वेळी उपस्थित होते.
शिवरायांच्या पुतळय़ास अभिषेक करून पूजा करण्यात आली. मिरवणुकीत जिल्हा मराठा संस्थेच्या विविध शाळा व कॉलेज, भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय, रमेश फिरोदिया शाळा, म. फुले विद्यालय आदींचे विद्यार्थी, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. ढोल, लेझीम, दांडिया, हलगीची पथके, वारकऱ्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी, ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ संदेश देणारा मनपाचा चित्ररथ सहभागी होते. महिलांसह कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत व फेटे परिधान करून, भगवे झेंडे घेऊन आले होते. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनीही लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. शिवराय, संत तुकाराममहाराज, मावळय़ांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी बँडपथक होते.
माळीवाडा-पंचपीर चावडी-माणिक चौक-कापड बाजार-तेलीखुंट-चितळे रस्ता-चौपाटी कारंजा-दिल्लीगेट मार्गे रेसिडेन्सियल विद्यालयाच्या प्रांगणात मिरवणूक विसर्जित करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आवारात जि. प. अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते. वसुंधरा वुमेन्स फाऊंडेशनच्या सुरेखा विद्ये, माया कोल्हे, अमल ससे, छाया राजपूत, कल्पना गांधी, छाया गायकवाड आदी महिलांनीही पारंपरिक वेशभूषा करत, फेटे परिधान करून छत्रपतींना अभिवादन केले. काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी फेटे परिधान करत ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा देत मोटारसायकल रॅली काढली.