22 October 2017

News Flash

हेवेदावे विसरुन कामाला लागा: उद्धव ठाकरेंचे नेत्यांना आदेश

जे अंगावर येतील, त्यांना शिंगावर घेणार

मुंबई | Updated: August 18, 2017 5:36 PM

Uddhav Thackeray : पंतप्रधान देशात १५ दिवस आधीच दिवाळी आली असे म्हणतात. मात्र, त्यांनी जरा शेतकऱ्यांच्या घरात जाऊन डोकवावे, म्हणजे त्यांना दिवाळी आलेय किंवा नाही, हे समजेल.

हेवेदावे विसरुन कामाला लागा असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहेत. राज्यात कर्जमुक्तीचे वातावरण घोंगावत असून प्रत्यक्षात कर्जमुक्ती झालेली नाही. कर्जमुक्ती ही सत्यावर आधारित असावी असे मत त्यांनी मांडले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. या बैठकीनंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, पक्षात मतभेद नाही. हेवेदावे विसरुन सर्वांनी कामाला लागावे असे निर्देश त्यांनी दिले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील आमदार मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हे विधान केले आहे. जे अंगावर येतील, त्यांना शिंगावर घेणार असेही त्यांनी म्हटले आहे.

सत्ताधारी भाजपवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. कर्जमुक्तीवर ठाकरे म्हणाले, राज्यात कर्जमुक्तीचे वातावरण घोंगावत असून प्रत्यक्ष कर्जमुक्ती झाली नाही. राज्यात कर्जमुक्ती सत्याला धरुन करावी. कर्जमाफीचा लाभ ८९ लाख शेतकऱ्यांना मिळणार. तर ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण ही आकडेवारी त्यांनी सभागृहात द्यावी. कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आणि पत्ते विधीमंडळाच्या सभागृहात सादर करावे असे त्यांनी सांगितले. सीमेवर युद्धाचे ढग असून चीनचे आक्रमण व पाकिस्तानची घुसखोरी सुरु आहे. अशा स्थितीत गोव्यातील पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकर यांचे विधान दुर्दैवी आहे. पराभव झाल्यास पुन्हा संरक्षणमंत्रीपदावर परतणार असे पर्रिकर यांनी म्हटले आहे. देशाच्या संरक्षण मंत्रीपदाकडे पोकळ पद्धतीने बघू नये असे ठाकरे यांनी सांगितले. सरकारने संरक्षणमंत्रीपदाकडे गांभीर्याने बघितले नाही तर देशात अराजकता माजेल अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘चुनावी जुमला’ करुन संरक्षणमंत्रीपद द्यायला नको असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, २०१९ मधील निवडणुकांची जबाबदारी त्यांनी जाहीर केली. विदर्भाची जबाबदारी दिवाकर रावते, उत्तर महाराष्ट्राची संजय राऊत, मराठवाड्याची रामदास कदम, ठाणे आणि कोकणची सुभाष देसाईंकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याचे ठाकरेंनी जाहीर केले.

First Published on August 18, 2017 5:36 pm

Web Title: shiv sena party chief uddhav thackeray on difference within party slams bjp government