सोलापुरात १२ नगरसेवक भाजपच्या संपर्कात

सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे वेध सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीसह विरोधी भाजप व शिवसेनेला लागले आहेत. राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने दोन मंत्री व खासदाराच्या बळावर महापालिकेची सत्ता खेचून आणण्याचा विडा उचलला आहे. यातच काँग्रेस व राष्ट्रवादीचे बारा नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट पालकमंत्री विजय देशमुख यांनी केल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालकमंत्री विजय देशमुख व सहकार, पणन तथा वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून सोलापूरला दोन मंत्री लाभले आहेत. सोलापूरचा खासदारही भाजपचाच आहे. ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सोलापूर शहराला पहिल्या प्रयत्नातच स्थान मिळाले आहे. त्याचे श्रेय भाजप घेऊ शकते. तसेच शहरात दोन उड्डाणपुलांच्या उभारणीसह परिसरात सुमारे २७ हजार कोटी खर्चाचे रस्ते उभारले जाणार आहेत. त्याचे भूमिपूजन अलीकडेच केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. त्याचेही श्रेय भाजप घेऊ शकते. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापालिकेतील सत्ता अबाधित राहण्यासाठी आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, काँग्रेसला कामाला लावण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे येऊन गेल्यानंतर लगेचच पालकमंत्री विजय देशमुख यांनीही काँग्रेस व राष्ट्रवादीचे बारा नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करायला इच्छुक असून हे सर्व जण आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघातून मागील २००४ पासून सतत तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे विजय देशमुख हे आपले स्थान आणखी बळकट होण्यासाठी ताकद पणाला लावत आहेत. त्यांचे जवळपास सर्व पक्षांतील नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांशी मधुर संबंध आहेत. त्याचा विचार करता आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक पातळीवर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील मतभेद पाहता सत्ता असूनही भाजपला महापालिका काबीज करता येईल काय, याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.