युतीतील नेत्यांकडे मुख्यमंत्रिपदाची क्षमता नसल्याचे सांगतानाच दुसरीकडे पक्षातील काही जण आपल्याला लक्ष्य करत असल्याचे शल्य काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आपण असलो तरी आपली क्षमता व पात्रता वरिष्ठांसमोर योग्यपणे मांडली आहे. यामुळे पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेण्यास समर्थ असल्याचे सूचक विधान राणे यांनी केले. तसेच काँग्रेसमध्येही या पदावरून छुपी स्पर्धा सुरू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने मंगळवारी उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रचारास राणे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर कोणी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तर कोणी ‘ब्लू प्रिंट’ मांडत आहेत. मुळात ‘व्हिजन डॉक्युमेंट’साठी आर्थिक स्त्रोत आणणार कोठून, कागदावरील योजना आणि प्रत्यक्ष स्थिती याचे भान नसल्याने संबंधितांकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे सांगत राणे यांनी ‘ब्लू प्रिंट’ लवकर आल्यास आम्हालाही थोडे मार्गदर्शन होईल, असे सांगत राज ठाकरे यांना टोला लगावला. आघाडीची सत्ता आल्यास अडीच वर्षांसाठी काँग्रेस आणि अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी असा मुख्यमंत्रिपदाचा कालावधी असेल अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला दगा दिला. त्याबाबत पक्षाची भूमिका लवकरच जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले. सेना-भाजप मुख्यमंत्रिपदाच्या गप्पा करीत असले तरी त्यांच्याकडे अनुभवी नेता नाही, जे आहेत, त्यांच्यात क्षमता नाही तसेच पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख कायम राहील, असा टोलाही त्यांनी हाणला. युती तुटली अशा कितीही बातम्या आल्या तरी प्रत्यक्ष युती अबाधित राहील. कारण दोन्ही पक्षांची ती मूलभूत गरज आहे. काँग्रेसमध्ये आपल्याला डावलले गेल्याची सल जाहीरपणे बोलून दाखविणारे सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांना पक्षात रहायचे असेल तर त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.