तिघांना अटक

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ालगतच्या छत्तीसगड व तेलंगणात वाघांचे शिकारी सक्रीय झाले आहेत. तेलंगणापाठोपाठ छत्तीसगड वनखात्यानेही या जिल्ह्य़ातील कुरखेडा व कोरची तालुक्यात छापे मारून तिघांना वाघाच्या कातडीसह अटक केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसात व्याघ्र कातडी व हाडांच्या तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. दरम्यान, शिकार केलेला वाघ महाराष्ट्रातील की छत्तीसगडमधील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये वाघांच्या शिकारीचे एकेक प्रकरण समोर येत आहे. असाच प्रकार गुरुवारी गडचिरोली येथे उघडकीस आला आहे. वाघाची शिकार करून त्याचे कातडे बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडमधील अंबागड चौकी वनाधिकाऱ्यांनी कुरखेडा तालुक्यातील शिवणी येथे अमोल नेवारे व यादव गावळ, तसेच कोरची तालुक्यातील पवन नरोटे या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या घराची झडती घेतली असता वाघाचे कातडे सापडल्याची माहिती वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंगे यांनी दिली. प्रत्यक्षात छत्तीसगडातील अंबागडचे उपवनसंरक्षक अरुण प्रसाद या आरोपींचा पाठलाग करत गडचिरोलीपर्यंत पोहोचले. त्यांना निश्चित माहिती होती की, वाघाची कातडी या तीनपैकी एकाकडे आहे. त्यामुळेच पाठलाग करून या तिघांनाही कातडीसह अटक केल्याची माहिती होशिंगे यांनी दिली. केवळ गडचिरोलीच नाही, तर छत्तीसगडमधील काही आरोपींनाही या प्रकरणी अटक केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, शिकार केलेला वाघ महाराष्ट्रातील होता की, अन्य राज्यातील, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, व्याघ्र शिकारी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या सीमावर्ती भागात छत्तीसगड, आंध्रप्रदेश व तेलंगणा परिसरात सक्रीय असल्याचे यानिमित्ताने समोर आली आहे.

कारण काही दिवसांपूर्वी म्हणजे २२ नोव्हेंबरला तेलंगणातील आसिफाबाद जिल्ह्य़ातील बेजूर येथे पट्टेदार वाघाच्या कातडीसह दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांनीही आलापल्ली वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार केल्यानंतर तेलंगणात कातडी नेल्याची कबुली देऊन वन विभागात खळबळ उडवून दिली होती. सुधाकर व संतोष, अशा या दोन आरोपींना तेलंगणा वन विभागाने अटक केली होती. त्यांची चौकशी केली असता त्यांनी हा कबुलीजबाब दिलेला होता. मात्र, राज्यातील वनाधिकारी आलापल्ली परिसरात वाघांचे अस्तित्वच नाही, असे सांगून जबाबदारी झटकण्यात मग्न होते. मात्र वीस दिवसांपूर्वीचे तेलंगणाचे व्याघ्र शिकारीचे प्रकरण विस्मरणात जात नाही तोच छत्तीसगडचे प्रकरण उधडकीस आल्यामुळे छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमा भागात व्याघ्र तस्करीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. केवळ गडचिरोली व चंद्रपूरच नाही, तर गोंदिया जिल्ह्य़ातील सालईनजीक वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या एकाला कोरची तालुक्यात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात २२ आरोपी अटकेत आहेत. हे सारे बघता तेलंगणा व छत्तीसगडमधून व्याघ्र शिकारी टोळय़ा व तस्कर सक्रीय असल्याचे दिसून येत आहे.