नगर शहराच्या औद्योगिकीकरणाबाबत असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग (आमी) या उद्योजकांच्या संघटनेच्या वतीने उद्या (मंगळवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे हेही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेने दिली.
केडगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहतीतील नीता मंगल कार्यालयात सायंकाळी ५ वाजता होणा-या या बैठकीच्या दृष्टीने आमी संघटनेने काही मागण्या केल्या आहेत. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नगर शहरातील औद्योगिकीकरणाच्या विविध प्रश्नांबाबत गेली तीन वर्षे संघटना कार्यरत आहेत. मात्र वारंवार मांडूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे उद्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
नागापूर औद्योगिक वसाहतीत आता नव्या उद्योगांना जागा शिल्लक राहिलेली नाही, शिवाय विस्तारालाही जागा नाही. त्यामुळे मोठे उद्योग येणे थांबले आहे. विस्तारासाठी परिसरातील काही जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत, मात्र मूळ जागामालक त्या देण्यास तयार नाही. बाजारमूल्याने त्या खरेदी करून राज्य सरकारने येथे विस्तारित जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ‘आमी’ने केली आहे. उद्याच्या बैठकीत त्यावर भर देण्यात येणार आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय नगरला सुरू करावे, ते सुरू होईपर्यंत नगर नाशिकऐवजी पुणे प्रादेशिक कार्यालयाला जोडावे अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
याशिवाय नागापूर औद्योगिक वसाहतीतील निंबळक ते सन फार्मा कंपनी या रस्त्यावर अलीकडे वाढत्या रहदारीमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा रस्ता चारपदरी करावा, नागापूर औद्योगिक वसाहतीला खेटून असलेल्या निंबळक येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधावा. विक्रीकर, उत्पादन शुल्क, आयकर ही सर्व कार्यालये नगरला सुरू करावीत, तोपर्यंतच या कामासाठी औरंगाबादएवजी पुणे कार्यालयाला नगर जोडावे, जिल्हा उद्योग केंद्राची इन्सेंटिव्ह योजना-२००१ ही पॅकेज स्कीम पुन्हा सुरू करावी आदी मागण्या उद्योजकांच्या संघटनेने केल्या आहेत.