मालवण तालुक्यातील आचरा येथील पर्ससिन व पारंपरिक मच्छीमारांत निर्माण झालेल्या तणावाला पोलीसच जबाबदार आहेत. पारंपरिक मच्छीमारांचे शांततेत आंदोलन सुरू असताना पोलीस बळ उपलब्ध ठेवण्यात कुचराई करणाऱ्यांना पोलीस अधीक्षकानी कारवाईस प्राप्त करावे तसेच पारंपरिक मच्छीमारावर सूड उगविणाऱ्या पोलीसांविरोधात शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. मालवणमध्ये जेल भरो आंदोलन करून आत्मसमर्पण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मत्स्योद्योग, पोलीस खाते यांना पारंपरिक मच्छीमार आंदोलनाची कल्पना आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी पारंपरिक मच्छीमार बेकायदा पर्ससिन नेटधारक मच्छीमारी करणाऱ्यांविरोधात संघर्ष करत आहेत त्याची कल्पना आहे असे छोटू सावजी, रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.
आचरा बंदरावर पर्ससिन नेटधारकविरोधात आंदोलन सुरू असतानाच रात्रीच्या वेळी ठिणगी पडली होती. त्याची कल्पना मत्स्योद्योग व पोलीस विभागाला असताना पुरेसा बंदोबस्त किंवा अनधिकृत पर्ससिन नेट मच्छीधारकावर कारवाई करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याची खबरदारी घेतली नाही असे तोरसकर यांनी म्हटले आहे.
पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्यांवर सूडभावनेने कारवाई सुरू आहे. महिलांना ३०७ कलमान्वये अटक केली जात आहे, हा पोलिसांनी छळवाद चालविला आहे. त्यामुळे त्याविरोधात संघर्ष करावाच लागेल तसेच पारंपरिक मच्छीमारावर एकतर्फी कारवाई सुरू आहे. त्यामुळे कायद्याचा धाक पारंपरिक मच्छीमारांना दाखविला जात असून बेकायदा मच्छीमारी करणाऱ्या पर्ससिन नेटधारकांना पाठीशी घातले जात आहे असे तोरसकर यांनी म्हटले आहे.
पर्ससिन नेट मच्छीमारीविरोधी आंदोलन तीव्र करावे लागणार आहे. पोलीस व प्रशासनाने पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय करत छळवाद चालविला आहे. त्या विरोधात जेल भरो, आत्मसमर्पण आंदोलन शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. मालवण तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.
पारंपरिक मच्छीमारांचे आंदोलन न्याय मागण्यासाठी सुरूच राहील. आपल्या हद्दीतील पर्ससिन मच्छीमारीला विरोध करणारे आंदोलन आणखी जोमाने करण्यात येणार आहे. सरकार दरबारीदेखील या प्रश्वावर आवाज उठविला जाईल, असे रविकिरण तोरसकर म्हणाले.