पेठ भागातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये वैज्ञानिक प्रकल्पांची आदिवासी विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून सफाईदारपणे दिलेल्या माहितीने राज्यपाल सी. विद्यासागर राव जसे आश्चर्यचकित झाले, तसेच गिरणारेलगतच्या नागलवाडीच्या निसर्गसौंदर्य आणि स्वच्छतेने भारावले. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राज्यपालांनी आदिवासी शाळांची विकास कामे व सुधारणांसाठी प्राधान्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले, तर नागलवाडी परिसर चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते, असे सांगत स्वच्छ भारताचे प्रतििबब येथे दिसत असल्याचे नमूद केले.
नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांच्या उपस्थितीत शुक्रवारी विविध कार्यक्रम झाले. आदिवासी विकास विभागाच्या पेठ तालुक्यातील शाळेत त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांशी, तर गिरणारेलगतच्या नागलवाडी येथे आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद साधला. नाशिक शहरापासून जवळच असलेल्या नागलवाडीचा निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर. त्याची अनुभूती घेतल्यावर राज्यपाल सुखावले. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला त्यांनी भेट दिली. वनहक्क कायद्यांतर्गत ६५ शेतकऱ्यांना ६८ हेक्टर जमिनींचे सात-बारा राव यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. स्वच्छ भारताची सुरुवात या गावातून होते. हा परिसर एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. त्यातून पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास राव यांनी व्यक्त केला. उपस्थित लाभार्थी शेतकऱ्यांनी राज्यपालांशी संवाद साधला. शासनाने वनजमिनी दिल्या असल्या तरी इतर अधिकारात लाभार्थ्यांची नावे लागली आहेत. मूळ मालक म्हणून ही नावे सात-बारा उताऱ्यात समाविष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. जमिनीबरोबर गंगापूर धरणातून पाणी मिळावे, अनेक गावांमध्ये आजही आदिवासींना जमिनी मिळू शकलेल्या नाहीत, याकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये राज्यपाल विद्यार्थ्यांसमवेत रमले. विज्ञान केंद्राच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैधानिक प्रयोगांची माहिती घेतली. या वेळी इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी इंग्रजीत त्यांना माहिती दिली. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण माहितीने राज्यपाल भारावले. भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. आदिवासी विद्यार्थ्यांनी आयएएस, आयपीएससारखी उच्चपदे भूषवावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आदिवासी जमातीत अनेक विद्यार्थी हुशार आहेत. या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यशस्वी होऊन आपली क्षमता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व पाहून त्यांच्या समवेत राज्यपालांनी छायाचित्रही काढून घेतले.