गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश धरणे पूर्ण भरली असून, त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. गोदावरी नदीवर असलेले जायकवाडी धरणही शुक्रवारी सकाळी जवळपास भरले. त्यामुळे आता या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जायकवाडी धरण ९५ टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे ९ वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले आहेत. त्यामधून १० हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गोदवारी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदीपात्रात कोणीही जावू नये, जनावरं, वाहनं पात्रात घेवून जावू नयेत, याबाबत सर्वांना सुचना करण्यात आलीये. दरम्यान, धरणात अजूनही पाण्याची आवक सुरुच आहे. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढल्यास नऊ आपातकालीन दरवाजेही उघडण्यात येतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

या वर्षी मुसळधार पावसामुळे नाशिक, नगर व मराठवाडय़ातही पाण्याची ददात नाही. तुडुंब भरलेल्या नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून दीड ते दोन महिने सलग पाणी सोडले गेले. एकटय़ा नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून आतापर्यंत तब्बल ५६ टीएमसी अर्थात ५६ हजार दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडण्यात आले होते.

गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे मुंबईसह अनेक जिल्ह्यातील धरणे काठोकाठ भरली. या पावसामुळे मुंबईकरांच्या येत्या वर्षभरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दोन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार, मोडक सागर धरण पूर्णपणे भरले असून, त्यामध्ये सध्या १२८.९३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. मोडक सागर तलाव क्षेत्रात दिवसभरात १३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तानसा धरणदेखील जवळपास पूर्णपणे भरले आहे. सध्या तानसा धरणात १४४.५९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तानसा धरणाची एकूण क्षमता १४५.०८ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. भातसा धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एकूण ९४२.१० दशलक्ष घनमीटर इतकी क्षमता असलेल्या या धरणात सध्या ९८.६९ टक्के म्हणजेच ९२९.७७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. तर यापूर्वी राज्यातील प्रमुख धरणांपैकी एक असणाऱ्या कोयना धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले होते. लापूरमधील उजनी धरण पूर्णपणे भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.