अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही गावात गांजा शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गालगत ही शेती केली जात होती. अक्कलकुवा पोलिसांनी शेतातील झाडे उद्ध्वस्त करत संशयिताला ताब्यात घेतले.
राजमोही शिवारात गांजाची शेती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक प्रल्हाद घाटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तमिलोद्दीन हबीबअली अक्राणी याच्या शेतावर धडक दिली. केळीच्या बागेच्या आडोशात गांजाची शेती केली जात असल्याचे निदर्शनास आले. शेतात सहा ते सात फूट उंचीची गांजाची एकूण ३६ झाडे होती. ही सर्व झाडे पोलिसांनी उपटून काढली. त्यांचे वजन ११३ किलो आढळून आले. या झाडांची सहा महिन्यांपूर्वी लागवड करण्यात आली होती. गांजाची झाडे कोणाच्या सांगण्यावरून लावली गेली आणि हा गांजा कोण खरेदी करणार होता याचा उलगडा पोलीस यंत्रणेला करावा लागणार आहे. यामागे मोठी टोळी असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. उपरोक्त प्रकरणात गुन्हा दाखल करून ७० वर्षीय तमिलोद्दीन हबीबअली अक्राणीला अटक करण्यात आली आहे. १० वर्षांपूर्वी या भागात गांजाच्या शेतीचा प्रकार उघडकीस आला होता.