येत्या ६ सप्टेंबर रोजी होणा-या सोलापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आपल्या नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. माजी महापौर तथा पालिका सभागृह नेते महेश कोठे यांनी पक्षाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावरील निष्ठा संपुष्टात आणत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पाश्र्वभूमीवर महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाला दगाफटका होऊ नये म्हणून पक्षश्रेष्ठींनी खबरदारी घेतल्याचे दिसून आले.
सोलापूर शहर काँग्रेस समन्वय समितीची बैठक सोमवारी सकाळी काँग्रेस भवनात पार पडली. यावेळी महापौरपदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत पक्षश्रेष्ठी घोषित करतील त्याच उमेदवाराला मतदान करण्यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना व्हिप बजावला. व्हिप बजावताना व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले. महेश कोठे व त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांचा अपवाद वगळता सर्व नगरसेवकांनी व्हिप स्वीकारण्यासाठी बैठकीला हजेरी लावली होती.
यंदाचे महापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे प्रा. सुशीला आबुटे, श्रीदेवी फुलारे व अनिता म्हेत्रे यांनी महापौरपद पदरात पाडून घेण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.