२९ कोटीत ९० मनोरे उभारणार

नक्षलवाद्यांना रोखण्यासाठी अतिदुर्गम भागातील दूरसंचार सेवा अधिक मजबूत करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून २८ कोटी ८० लाखांचा निधी खर्च करून ९० मनोरे (टॉवर) उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व मनोरे ‘सोलार’वर चालणार आहेत. यामुळे गडचिरोलीची कनेक्टिव्हीटी वाढणार आहे.

नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात होरपळणाऱ्या या जिल्हय़ात दुर्गम, अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात कनेक्टिव्हीटी नाही. असंख्य गावे जंगलात आहेत. तेथे पोलीस यंत्रणा कार्यरत असली तरी त्यांचा मुख्यालयाशी संपर्क होत नाही. पावसाळय़ात तर पूर परिस्थितीमुळे शेकडो गावांचा संपर्क तुटलेला असतो. यावेळी विद्युत प्रवाहासोबतच दूरसंचार सेवाही खंडित झालेली असते. नक्षल दलमशी चकमक उडाली आणि पोलिसांना अतिरिक्त कुमक बोलवायची राहिली तरी संपर्क होत नाही. अशा स्थितीत पोलीस दलाचे नुकसान होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रालयाने गडचिरोली जिल्हय़ात नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी दूरसंचार सेवा अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून २८ कोटी ८० लाखांचा निधी खर्च करून ९० मनोरे उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे, हे मनोरे विद्युत विभागाच्या विजेच्या भरवशावर नाही तर ‘सोलार’वर चालणार आहे. अतिदुर्गम भागात पहिल्या टप्प्यात ८० गावांमध्ये हे मनोरे उभारण्यात येणार आहेत. ही गावे अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात आहेत. अशा गावात ‘व्हीसॅट’चा उपयोग केला जाणार आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४० गावांमध्ये ‘मोबाईल टॉवर’ लावण्यात येणार आहेत. या सर्व मनोऱ्यामुळे गडचिरोलीत कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा जिल्हा पोलीस दलासोबतच आरोग्य विभाग, वन विभागालाही होणार आहे. सिरोंचा, भागरागड, एटापल्ली या अतिदुर्गम तालुक्यांतर्गत येणाऱ्या गावातील लोक थेट संपर्कात येणार आहेत. यापूर्वी ‘सोलार’ पद्धतीने गडचिरोलीत ३७ ‘मोबाईल टॉवर’ची उभारणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर लगेच ९० मनोरे उभारण्यात येत असल्याचे दूरसंचार विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ‘मोबाईल टॉवर’मुळे नक्षलवाद्यांवर विजय मिळविणे सहज शक्य होणार आहे. एकदा का या भागाची कनेक्टिव्हीटी वाढली की माहितीचे आदान- प्रदान तात्काळ होईल आणि नक्षलवादाच्या हिंसाचारावर विजय मिळविणे शक्य होणार आहे. सध्यातरी या मनोऱ्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.