शिवसेनेने स्वतःच हसं करुन घेतले असून सेना सत्तेतून बाहेर पडली तरी काहीच फरक पडत नसल्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असताना घरचा वाद रस्त्यावर आणणे योग्य नसल्याचे सांगत पाटील यांनी सेनेवर निशाणा साधला.

शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या तणाव निर्माण झाला असून लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे शिवसेनेने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेकडे असलेल्या खात्यांवर भाजपने कधीच टीका केली नाही. याउलट उद्योगमंत्री सुभाष देसाईंना विरोधकांनी घेरले असताना मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले अशी आठवण त्यांनी शिवसेनेला करुन दिली. दुटप्पी भूमिका घेऊन शिवसेनेने स्वतःच हसं करुन घेतल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाबाबत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राणे यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून शहा यांनी राणेंना दोन्ही बाजू समजावून सांगितल्या आहेत. आता राणेच दसऱ्यापर्यंत पुढील निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने विलंब होत असून दिवाळीपूर्वी कर्जमाफी निश्चित होणार आहे. कर्जमाफीचा पहिला लाभ उस्मानाबाद जिल्ह्याला मिळणार असून ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कर्जमाफी होईल असे आश्वासन त्यांनी दिले.