मुंबईत १९६४ मध्ये स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेला ५० वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त देशभर जिल्हा आणि राज्य पातळीवर हिंदू संमेलनांसह विविध सेवा प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय  संमेलन होत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री विनायकराव देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २२ ते २४ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये वर्ल्ड हिंदू काँग्रेस होणार असून त्याला  जगभरातील दोन हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
विहिंपची स्थापना झाली त्यावेळी स्वामी चिन्मयानंद अध्यक्ष होते. त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सुशीर मुनी, रा.स्व. संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, तारासिंग आदी उपस्थित होते. २७ देशांमध्ये परिषद विविध उपक्रम राबविते. १७ आणि १८ ऑगस्टला गोकुळ अष्टमीला देशभर सुमारे ६ हजार शोभायात्रा निघतील. विदर्भात १५० आणि राज्यात ५०० शोभायात्रा काढण्यात येतील. त्याच दरम्यान १६ ते १८ ऑगस्टदरम्यान मुंबईला सांदीपनी साधनालय परिसरात देशभरातील संत आणि विहिंपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात ५० वर्षांंच्या वाटचालीचा आढावा घेऊन वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा होईल.
रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते १७ नोव्हेंबरला सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन होईल. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत देशभरात ६०० ठिकाणी हिंदू संमेलने आयोजित केली आहेत. याशिवाय मुंबई, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि भोपाळमध्ये विराट हिंदू संमेलन होणार असून येथे १ लाखावर लोक उपस्थित राहतील. देशभरातील छोटय़ा-मोठय़ा ३ लाख गावांपर्यंत सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून विहिंप पोहोचणार आहे.
गुढीपाडवा ते रामनवमीच्या काळात देशभर १ लाख गावात रामोत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत. ५ व ६ सप्टेंबरला नाशिकमध्ये संत संमेलन घेण्यात येणार असून देशभरात १७ ठिकाणी सेवाकुंभ महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
विदर्भात ८ फेब्रुवारीला सेवाकुंड संमेलन होणार आहे. त्यात विहिंपद्वारे चालविण्यात येणाऱ्या विविध सेवा प्रकल्पांची माहिती देणारे प्रदर्शन राहणार आहे. यानिमित्त चर्चासत्र होणार आहे. २ नोव्हेंबर हा दिवस विहिंपतर्फे बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी देशभरात मोठय़ा शहरात रक्तदान आणि नेत्रदानाचे कार्यक्रम घेऊन १ लाखापेक्षा जास्त लोक रक्तदान करतील. शिवाय, नेत्रदानाचा प्रकल्प राबविण्यात येईल. शैक्षणिक क्षेत्रातएकल विद्यालय हा उपक्रम राबविला जात असून ५१ हजार एकल विद्यालये असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. यावेळी अजय निलदावार आणि सनत गुप्ता उपस्थित होते.