‘तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर हास्याचे स्फोट घडविले. नाटकातील ‘प्राध्यापक बारटक्के’ यांनी नाटकात वापरलेली ‘ह हा ही ही हु हू’ ची बाराखडी नाटकाचे खास आकर्षण ठरली. ५ ऑक्टोबर १९७२ रोजी प्रथम सादर झालेल्या या नाटकाला ४२ वर्षे झाली तरी वेगवेगळ्या संस्थांकडून व नटसंचात नाटकाचे प्रयोग अद्यापही सुरू आहेत. हे नाटक आता पाच हजारी प्रयोगाच्या उंबरठय़ावर आले असून त्यानिमित्ताने ‘ह हा ही ही हु हू’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा. मधुकर तोरडमल लिखित आणि दिग्दर्शित या नाटकात स्वत: तोरडमल यांनीच ‘प्रा बारटक्के’ ही भूमिका रंगविली होती. या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरश: पोट धरून हसायला लावले होते. रंगमंच-मुंबई आणि अमेय निर्मित ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’चा संयुक्त ५ हजारांवा प्रयोग ५ ऑक्टोबर रोजी शिवाजी मंदिर येथे होणार आहे. या प्रयोगाच्या निमित्ताने ही स्पर्धा होत आहे. सध्या रंगमंच-मुंबई आणि अमेय निर्मित या नाटकाचे प्रयोग सुरु असून अभिनेते उपेंद्र दाते हे ‘प्रा. बारटक्के’ यांची भूमिका करीत आहेत.      
स्पर्धेतील विजेत्यांना ५ हजार रुपयांचा एक आणि ५०० रुपयांचे ५ असे पुरस्कार या पाच हजारी प्रयोगाच्या वेळी प्रदान केले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर अशी आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रसिकांनी प्रवेशपत्रिकेसाठी फक्त आपला पत्ता ‘एसएमएस’ करून कळवायचा आहे. त्यानंतर स्पर्धकाला प्रवेश पत्रिका पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी उपेंद्र दाते यांच्याशी ९८२० ७५३ १९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.  या पाच हजारी प्रयोगाच्या निमित्ताने गेल्या ४२ वर्षांत हे नाटक ज्यांनी सादर केले त्या सर्व नाटय़संस्था आणि यात काम केलेल्या रंगकर्म्ीची सूचीही प्रकाशित केली जाणार आहे.
त्यासाठी याबाबतची माहिती रंगमंच, द्वारा उपेंद्र दाते, १६ अ, लक्ष्मी नारायण बिल्डिंग, धसवाडी, ठाकुरद्वार, मुंबई-४००००२ या पत्यावर कळवावी, असे आवाहन ‘रंगमंच’च्या निर्मात्या जयश्री दाते यांनी केले आहे.