ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांचा दफनविधी शुक्रवारी येथील लोधी मार्गावरील दफनभूमीत करण्यात आला. वयाच्या १०२व्या वर्षी गुरुवारी त्यांचे निधन झाले.
जोहरा सेहगल यांचे पुत्र पवन आणि कन्या किरण त्याचप्रमाणे नातवंडेही दफनविधीसाठी उपस्थित होते. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, अभिनेत्री शबाना आझमी, जावेद अख्तर, एम. के. रैना, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सिरकर आदी मान्यवरांनी जोहरा सेहगल यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
सेहगल यांच्या निधनामुळे कला आणि निर्मितीच्या क्षेत्रातील पोकळी कधीही भरून निघणार नाही. आपल्या सहज अभिनयाने त्यांनी असंख्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले, असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
गानकोकिळा लता मंगेशकर यांनी जोहरा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वयाच्या १०२व्या वर्षीही त्यांच्यातील सळसळते चैतन्य कौतुकास्पद होते, असे महानायक अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. तर जोहरा या वयातही एका खटय़ाळ मुलीसारख्या होत्या, असे शाहरूख खान यांनी म्हटले आहे.
आपण त्यांच्यासमवेत २००२ मध्ये एका नाटकात काम केले होते, त्या वेळी त्या ९० वर्षांच्या होत्या, त्या सदैव हसतमुखही होत्या असे शबाना आझमी म्हणाल्या. २१व्या शतकातील रंगभूमीचा इतिहास सेहगल यांच्या उल्लेखाविना लिहिताच येणार नाही, असे या वेळी जावेद अख्तर म्हणाले.