‘हेट स्टोरी २’सारख्या चित्रपटामुळे समाजात स्त्रीयांबाबतच्या गुन्हेगारी मानसिकतेत वाढ हेईल, असा आरोप करत जेडीएसच्या सदस्यांनी ‘हेट स्टोरी २’ या बॉलिवूडच्या हिंदी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी कर्नाटक विधानसभेत केली. याविषयी बोलताना वाय. एस. व्ही. दत्त म्हणाले, ‘हेट स्टोरी २’ चित्रपटातील बोल्ड दृष्ये समाजात स्त्रीयांबाबतच्या गुन्हेगारी मानसिकतेत आणि बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होईल, म्हणूनच ‘हेट स्टोरी २’ चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळ थांबविणे गरजेचे आहे. विशाल पांडे दिग्दर्शित हा चित्रपट २०१२ साली आलेल्या ‘हेट स्टोरी’चा सिक्वेल आहे. पोलिसांना चित्रपटाची माहिती गोळा करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री के. जे. जॉर्ज यांनी सांगितले. राज्यात स्त्रीयांवरील वाढत्या बलात्काराच्या घटनांवरील चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्री सिध्दारमैय आणि गृहमंत्र्यांनी चित्रपटातील प्रौढ दृष्यांची पाहणी करण्याचे आदेश पोलिसांना द्यायला हवेत, असे दत्त म्हणाले. याआधीदेखील सेन्सॉर बॉर्डाने टीव्हीवर दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटाच्या ट्रेलरमधील आणि गाण्यातील बोल्ड दृष्यांवर आक्षेप नोंदविला होता. यानंतर चित्रपटकर्त्यांकडून यात योग्य ते बदल करण्यात आले.
पोलिस आयुक्त राघवेन्द्र औराडकर यांना चित्रपटातील बॉल्ड दृष्यांचा तपास करण्यासाठीचे आदेश देण्यात आले असून, याबाबतचा अहवाल सादर झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जॉर्ज म्हणाले. ‘हेट स्टोरी २’मध्ये सुरवीन चावला आणि जय भानुशाली ही जोडी प्रमुख भूमिकेत आहे.