राजस्थानच्या भंवरी सेक्स कांडावर अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली, आता अन्य एक चित्रपटकर्ता देशातील गलिच्छ राजकारणावर आणि भ्रष्ट नेत्यांवर ‘हुस्न, हेरॉईन और हथियार’ नामक चित्रपटाची निर्मिती करीत आहे. भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवर तयार होत असलेल्या या चित्रपटात गुन्हेगार आणि राजकारणी यांच्यातील साटेलोटे आपल्या समाजासाठी आणि देशासाठी किती घातक होऊ शकते हे दर्शविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अंमली पदार्थांची तस्करी आणि मंत्र्यांकडून स्त्रियांवर होत असलेल्या दुष्कृत्यावर आधारीत हा चित्रपट हॉरर, सस्पेन्स आणि पॉलिटीकल थ्रिलरने भरलेला असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक अनुपम परदेशी म्हणाले. चित्रपटात केवळ राजस्थानमधीलच नव्हे, तर देशातील अन्य भागातील राजकारण्यांच्या काळ्या कारभारावरसुद्धा प्रकाश टाकला जाणार असून, देशाला हलवून टाकणाऱ्या अनेक राजकीय घटनांचा यात समावेश करण्यात आला आहे. ‘नवधा मुव्हिज’च्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे शुटिंग प्रतापगढच्या आसपासच्या भागात करण्यात आले. या चित्रपटात अरुण बक्षी, श्यामल सेठ, निकिता तिवारी, एग्नेस सोनकर, पूनम शहा आणि अरविंद व्यास इत्यादींच्या भूमिका आहेत. चित्रपटातील ‘मिस कॉल कर ले’ आणि ‘मेरी नथनी की किमत’ या देन आयटम साँगची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर कमलनाथ यांनी केली आहे. चित्रपटात महिला कल्याण मंत्र्याची व्यक्तिरेखा साकारत असलेले अरुण बक्षी मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जे. के. खाटवा निर्माता आणि मनोहर राठोड हे सह-निर्माता असलेल्या या चित्रपटाचे गीतकार आणि संगीतकार इकराम राजस्थानी आहेत.