एखादी भन्नाट कल्पना सुचणे हे संवेदनशील मनाचे लक्षण आणि त्याच्या योग्य अंमलबजावणीचा प्रयत्न करणे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन होय. पूनम धिल्लॉन हिने आपल्या याच गुणांचा प्रत्यय देण्याचे पाऊल टाकले. यश चोप्रा दिग्दर्शित ‘त्रिशूल’ या १९७८ च्या चित्रपटापासून अभिनयाच्या क्षेत्रात असणाऱ्या पूनमचे चित्रीकरण, पर्यटन आणि विवध प्रकारचे सोहळे यासाठी सतत विदेश दौरे सुरु असतातच, त्यातूनच तिच्या लक्षात आले की जगभर किती तरी कर्तबगार भारतीय आहेत, त्यांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखवले आहे, त्यातील काही निवडकांचा विशेष सत्कार घडवावा काय? त्यानुसार तिने तब्बल दोन-तीन वर्षे इंटरनेटवरून माहिती मिळवायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या लक्षात आले की, आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त हुशार भारतीय विविध देशात आहेत. त्यानाच पुरस्कार देवून गौरवण्यासाठी तिने पुढाकार घेतला आणि त्यातूनच आंतरराष्ट्रीय कर्तबगार भारतीय पुरस्कार जन्माला आला. २७ जुलै रोजी गोरेगावच्या चित्रनगरीत या पुरस्कार वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजकारण, आणि खेळ ही क्षेत्र वगळता अन्य सर्व क्षेत्रातील मान्यवराना हा पुरस्कार दिला गेला. त्यात विज्ञान, कला, पत्रकारिता, वैद्यक, माध्यम, फॅशन असा एकूण नऊ क्षेत्रांचा समावेश केला गेला.