अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेल्वेट’ हा चित्रपट रणबीर कपूरची कारकीर्द सावरण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. मात्र, ‘बॉम्बे वेल्वेट’ सपाटून आपटला. रणबीरच्या कामाचेही फोर कौतुक झाले नाही. त्यामुळे याच वर्षी प्रदर्शित होणारा अनुराग बसू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाकडे रणबीरच्या आशा केंद्रित झाल्या आहेत. पण, हाही चित्रपट अडचणीत सापडला असून त्याचा पन्नास टक्के भाग पुन्हा चित्रित करण्याचा निर्णय दिग्दर्शक अनुराग बसूने घेतला आहे. या वेळी, रणबीर या चित्रपटाचा निर्माताही असल्याने त्याच्यावर दुहेरी ताण आहे.
या वर्षी रणबीरचे दोन चित्रपट आले. ‘रॉय’ हा वेगळ्या प्रकारचा चित्रपट असूनही तो आपटला आणि ‘बॉम्बे वेल्वेट’ हा आता बॉलीवूडसाठीही दंतकथा बनून राहिला आहे. एवढय़ा मोठय़ा अपयशानंतर आपली पहिलीच निर्मिती असलेला ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट तरी चांगला चालावा, यासाठी रणबीरची धडपड सुरू आहे. कतरिना आणि रणबीर या जोडीचा हा संगीतमय चित्रपट त्याच्या स्वरूपामुळेच अडचणीत आला आहे. रणबीर आणि कतरिनाच्या या चित्रपटाची कथा संगीतमय पद्धतीने एका सूत्रधाराच्या माध्यमातून उलगडण्यात आली आहे. चित्रपटाचे निम्म्याहून अधिक चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर अनुराग बसूला माहिती मिळाली की ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘मिर्झिया’ हा चित्रपटही त्याच स्वरूपातील संगीतमय चित्रपट आहे. चित्रपटाची मुख्य जोडीच क थेतील गीत पडद्यावर सादर करताना दिसते. ही माहिती मिळाल्यानंतर अनुरागने आपल्या चित्रपटाचा अध्र्याहून अधिक भाग नव्याने चित्रित करायचा निर्णय घेतला आहे.
अनुरागचा निर्णय चित्रपटाच्या हितासाठी असला तरी पुन्हा चित्रीकरण ही रणबीरसाठी डोकेदुखीच ठरणार आहे. निर्माता म्हणून चित्रीकरणाचा खर्च वाढणार ही एक गोष्ट आणि चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागणार ही दुसरी गोष्ट. या दोन्ही गोष्टी त्याला अडचणीत टाकणाऱ्या आहेत. ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच लग्नाची तारीख ठरवायची अशी रणबीर आणि कतरिनाची योजना होती. त्यानुसार, सगळे नियोजन सुरू असतानाच चित्रपट पुढे ढकलला गेल्याने लग्नाचा बेतही त्याला पुढे ढकलावा लागणार आहे. मात्र, पुन्हा चित्रीकरणाशिवाय पर्याय नाही, असे अनुरागचे म्हणणे आहे. याआधी अनुराग बसूने ‘बर्फी’ही असाच पुन्हा चित्रित केला होता. त्याला यश मिळाले. पण, अनुराग कश्यपने ‘बॉम्बे वेल्वेट’ पुन्हा चित्रित करूनही त्याला यश साध्य झाले नाही. त्यामुळे ‘जग्गा जासूस’चे काय होणार?, हा प्रश्न रणबीरला राहून राहून सतावत आहे.