गावाच्या गल्लीत दुतर्फा लावलेला मंडप, रोषणाईचा झगमगाट, डॉल्बीवर वाजणारे अजय-अतुलचे धडाकेबाज संगीत, भव्य मिरवणूक, दिग्गजांची मांदीयाळी.. अशातच आवाज आला साऊंड, रोल, कॅमेरा, एॅक्शन.. अन् अशा प्रफुल्लीत वातावरणात जाऊंद्या ना बाळासाहेब या चित्रपटाचा धूमधडाक्यात मुहूर्त झाला.तंत्रज्ञ, सहकारी, स्पॉट बॉय यांची धावपळ, कलाकारांची मेकअप करून शॉटसाठीची लगबग तर दिग्दर्शकाची योग्य आणि हवा तसा शॉट मिळण्यासाठी होणारी तगमग.. हे सारे बघण्यासाठी गच्चीतून, दारातून डोकावणारे तसेच पारावर गर्दी करून बसणारे गावकरी.. अशा अत्यंत आनंदी वातावरणात चित्रीकरणाला सुरूवात झाली. जरा अनोख्या ढंगात हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटाच्या निमित्ताने अजय-अतुल संगीतकाराबरोबरच निर्मात्याच्याही भूमिकेत असून गिरीश कुलकर्णी कथा, पटकथा लेखक, अभिनेता, दिग्दर्शक अशा चौरंगी भूमिकेतून रसिकांना भेटणार आहेत.
ajay1
चित्रपटाचा मुहूर्त वाईजवळील केंजळ या गावात करण्यात आला. यावेळी अजय-अतुल यांच्या आई निर्मला गोगावले यांच्याहस्ते कॅमेरा समोर श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर गिरीश कुलकर्णी यांनी ज्या दिग्दर्शकांकडे काम केले आहे असे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, सतीश मनवर, निखील महाजन, गजेंद्र अहिरे या मान्यवरांच्या हस्ते क्लॅप करून चित्रीकरणाला सुरूवात करण्यात आली. अभिनेते मोहन जोशी, रिमा लागू, सई ताम्हणकर, पुर्वा पवार, किशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभूणे, गिरीश कुलकर्णी, निर्माते पूनम शेंडे, रोहिणी अजय गोगावले, पूनम अतुल गोगावले, उमेश कुलकर्णी, विनय गानू, प्रशांत पेठे, चित्रपटचा संपूर्ण टीम याबरोबरच सुमारे शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते. पहिला शॉट गजेंद्र अहिरे यांनी कॉल केला. चित्रपटाचे चित्रीकरण फेबुवारी-मार्च महिन्यात होणार असून संपूर्ण चित्रीकरण पुणे शहर व जिल्हा परिसरात होणार आहे.चित्रीकरणार्या पहिल्याच दिवशीचा पॅक अप दुसर्या दिवशी पहाटे ४वाजता झाला. परंतु चित्रीकरणाच्या सुरूवातीला असणारा तोच उत्साह पॅकअपच्या वेळीही कलाकारांमध्ये कायम होता.
या चित्रपटाच्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. याशिवाय अजय-अतुलदेखील प्रथमच निर्मिती क्षेत्रात उतरत असून त्यांच्या प्रथम स्वनिर्मित चित्रपटातील गाणीदेखील मराठी रसिकांसाठी पर्वणीच असणार आहे. याबरोबरच वळू, विहीर, देऊळ यांचे दिग्दर्शक, तर मसाला, वळू व पुणे-५२ यासारख्या चित्रपटांचे निर्माते उमेश कुलकर्णी, मॅटर, स्वामी पब्लिक लिमीटेडसारखे चित्रपट केलेल्या अनुभवी निर्मात्या पूनम शेंडे तसेच अनुमती, पोस्टकार्ड, हायवेसारख्या चित्रपटांचे निर्माते विनय गानू व या चित्रपटासाठी सहनिर्माते म्हणून प्रशांत पेठे यांचीही साथ लाभली आहे.