बॉलीवूडमध्ये चरित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता कंगना राणावतचा समावेश होण्याची शक्यता आहे.  झाशी संस्थानाच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यावर बनविण्यात येणाऱ्या या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी कंगनाची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. केतन मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरूवात होण्यापूर्वी कंगनाला घोडेस्वारी, तलवारबाजीसारख्या काही गोष्टी शिकून घ्याव्या लागणार आहेत. तर ब्रिटीश अधिकारी जनरल ह्युज रोझच्या भूमिकेसाठी हॉलीवूड अभिनेते ह्युज ग्रॅण्ट यांना विचारणा करण्यात आल्याचेही समजत आहे. झाशीमध्ये 1858 साली ब्रिटीश राजवटीविरोधात झालेल्या उठावाचे राणी लक्ष्मीबाईंनी नेतृत्व केले होते. दिग्दर्शक केतन मेहता यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला असून हा चित्रपट 2005मध्ये आलेल्या ‘मंगल पांडे’ या चित्रपटाचा पुढचा भाग असल्याचेही त्यांनी सांगितले. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. गेल्या काही चित्रपटांच्या यशानंतर कंगनाची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. त्यामुळे  आता कंगना या भूमिकेचे आव्हान कसे पेलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.