गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूड सेलेब्रिटीजच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या वाऱ्या वाढू लागल्या आहेत. नवोदित तारेतारकांपासून ते प्रस्थापित कलाकारांपर्यंत प्रत्येकालाच एकदा तरी या फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपले पाय पडावेत, अशी इच्छा मनामध्ये असते. त्यामुळे कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तारखा जाहीर झाल्यावर, बॉलीवूडमध्ये या फेस्टिव्हलला जाणाऱ्या कलाकारांची यादी तयार होण्यास सुरुवात होते. यंदा या यादीमध्ये कतरिना कैफच्या नावाचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून एका सौंदर्यप्रसाधन ब्रॅण्डसाठी ऐश्वर्या राय बच्चन दरवर्षी नियमितपणे कान्सवारी करते आहे. त्यामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये सोनम कपूर आणि फ्रिदा पिंटोचा समावेशही झाला आहे. याच ब्रॅण्डसाठी कतरिना यंदा कान्स फेस्टिव्हलला जाणार असून ही तिची पहिलीच कान्सवारी ठरणार आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटचे आकर्षण बॉलीवूडला कायमच होते. ऐश्वर्या राय बच्चन २००२मध्ये पहिल्यांदा या रेड कार्पेटवर अवतरली होती.
कान्सच्या रेड कार्पेटवर बॉलीवूडचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली अभिनेत्री होती. त्यानंतर ती सदिच्छादूत असलेल्या सौंदर्यप्रसाधन ब्रॅण्डसाठी कित्येक वर्षे न चुकता या रेड कार्पेटवर आपली मक्केदारी तिने कायम ठेवली होती. आराध्याच्या जन्माच्या वेळी मात्र या प्रथेला तडा जात सोनम कपूर आणि फ्रिदा पिंटोनेही ऐश्वर्यासोबत या ब्रॅण्डच्या प्रतिनिधी म्हणून कान्सवाऱ्या करण्यास सुरुवात केली होती. त्याच वेळी ऐश्वर्याची लोकप्रियता कमी झाल्याच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या, पण आराध्याच्या जन्मानंतर तिने कान्समधील आपल्या लूक्सनी सर्वाचे लक्ष परत आपल्याकडे वळविले. मागच्याच वर्षी याच ब्रॅण्डने अभिनेत्री कतरिनालाही आपली सदिच्छादूत केले होते.
त्या वेळीच कतरिनाने पुढील वर्षी आपण कान्सवारी करणार असल्याचे जाहीर केले होते. यंदा १३ ते २४ मे दरम्यान रंगणाऱ्या १२ दिवसांच्या या चित्रपट सोहळ्यामध्ये करिना या ब्रॅण्डचे प्रतिनिधित्व करणार असून, विशेष म्हणजे तिला या वेळी सोनम कपूरची साथ मिळणार आहे.
या वेळी बोलताना कतरिनाने, कान्समध्ये जगभरातील विविध विषयातील उत्तम सिनेमांचा गौरव होतो. त्यामुळे आपण पहिल्यावहिल्या कान्सवारीसाठी उत्सुक असल्याचे सांगितले आहे. तर कान्समध्ये आपल्या रेड कार्पेट लूक्समूळे प्रसिद्ध असलेल्या सोनमनेही कतरिनाला शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिनाला कपडय़ांची आणि स्टाईलची उत्तम जाण असून, तिच्यासोबत कान्सच्या रेड कार्पेटवर चालण्यास आपण उत्सुक असल्याचे तिने सांगतिले.