अद्वितीय गायक, संगीतकार किशोर कुमार यांची आज ८६ वी जयंती. गायिकीचं कुठलंही प्राथमिक शिक्षण न घेतलेल्या किशोरदांच्या आवाजाने सगळ्यांनाच भूरळ घातली, जी आजच्या पिढ्यांवरही कायम आहे. रोमॅण्टिक गाणी असो की विरहाची, किशोरदांच्या आवाजाने ती अजरामर बनली. कोणासाठी विक्षिप्त, खोडकर, कोणासाठी गंभीर वाटणारे किशोरकुमार हे एक गायक म्हणून आपलं नाण खणखणीत वाजवतात. ते आपल्याला कोणत्याही मूडमध्ये आवडतात. अगदी ‘चिल चिल चिल्लाके…’ म्हणणारे खट्याळ किंवा ‘देखा ना हाय रे सोचा ना म्हणणारे…’ किंवा ‘एक आँख मारो…’ असा लव्हरबॉय किशोरकुमार गाण्यांद्वारे आपल्यावर छाप पाडून जातात. त्यांच सगळ्यात लोकप्रिय गाणं कोणतं? अशी निवड करावयास सांगितले तर ते कोणासाठीही कठीणच आहे.
लहानपणापासून ते गायक-अभिनेता के. एल. सैगल यांचे प्रचंड चाहते होते. त्यांच्या गायनशैलीची नक्कल करण्याचा ते प्रयत्न करीत असत. परंतु, संगीत दिग्दर्शक एस. डी. बर्मन यांनी त्यांना स्वत:ची गायनशैली निर्माण करण्याचा सल्ला दिला. पुढे जाऊन त्यांनी स्वत:ची अशी गायनशैली विकसित केली. एस डी बर्मन यांनी त्यांना अनेक गाणी गाण्याची संधी दिली. दोन्ही बर्मनच्या साथीने किशोर यांना खूप चांगली गाणी गायला मिळाली. देवआनंद यांच्यासाठी गाण्याचा पहिला ब्रेक मिळण्याआधी मोहमद रफी आणि क्वचित हेमंतकुमार यांचा आवाज त्यांना दिला जाई. पण किशोर कुमार यांनी देवआनंदजींना आवाज द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या कारकिदीर्ला बहर येण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच देवआनंद यांचे ते लाडके गायक होते. ‘ऐ दिल कहा तेरी मंझिल’, ‘हम है राही’, ‘जीवन के सफर में राही’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘क्या से क्या हो गया’, ‘ओ निगाहे मस्ताना’, ‘आँखो में क्या जी’, ‘दुखी मन मेरे’, ‘अरे यार मेरे तुम भी हो गजब’, ‘फुलो के रंग सें’, ‘शोखियो मे घोला जाये’, ‘काँची रे काँची’, ‘पल भर के लिए कोई प्यार’ यांसारखी गाणी किशोरजींनी त्यांच्यासाठी गायली.
त्याचबरोबर राजेश खन्ना यांचीही गाजलेली बहुतेक गाणी किशोरजींनीच गायली आहेत. ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू’, ‘ज़िंदगी इक सफ़र है सुहाना’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘चिंगारी कोई भडके’, ‘जिंदगी का सफर’, ‘जीवन से भरी तेरी आँखे’, ‘आज ना छोडेंगे’, ‘ये शाम मस्तानी’, ‘अच्छा तो हम चलते है’, ‘आप के अनुरोध पर’, ‘आते जाते खुबसूरत’, ‘भीगी भीगी रातो में’, ‘एक अजनबी हसीना से’, ‘हम दोनो दो प्रेमी’, ‘चला जाता हू किसी की धून में’, ‘चल दरिया में’, ‘दिवाना लेके आया है’, ‘हमे तुमसे प्यार कितना’, ‘मेरे नैना’, ‘जय जय शिवशंकर’, ‘करवटे बदलते रहे’, ‘मेरे दिवानेपन की कोई’, ‘सच्चाई छूप नही सकती’, ‘अगर तुम ना होते’  अशा अनेक लोकप्रिय गाण्यांनी राजेश खन्नाच्या लोकप्रियतेला चारचाँद लावले.
किशोरदा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचा सदाबहार आवाज सदैव रसिकांच्या मनात कायम राहिल.