अन्य भाषकांना मराठी शिकता यावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘माय मराठी’ या पुस्तकाच्या पहिल्या पातळीचे पुस्तक बुधवारी प्रकाशित करण्यात आले. या उपक्रमामध्ये राज्य शासनाने कोणताही रस दाखविला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करत आमिर खानने मराठी मराठी भाषा वैश्विक पातळीवर पोहचविण्यासाठी राज्य शासनाने पुढे यावे अशी सूचना केली.
गेली काही वष्रे मराठीचे शिक्षण घेत असलेल्या आमिर खानने अन्य भाषकांना मराठी शिकता यावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागातर्फे हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाला आर्थिक सहकार्य केले आहे. या उपक्रमाची संकल्पना खूप स्तुत्य असून यामुळे अन्य भाषकांना मराठी शिकणे सोपे होईल, अशी अपेक्षा आमिरने प्रकाशन प्रसंगी मराठीत केलेल्या भाषणातून व्यक्त केली. मी जेव्हा सुहास लिमये सरांकडे मराठी शिकण्यास सुरुवात केली तेव्हा एखादे पुस्तक आहे का, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यांनी नाही म्हटले. त्यानंतर काही महिन्यांनी माझ्यासमोर जर्मन विभागातर्फे या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यामुळे मी या प्रकल्पात सक्रीय सहभागी झाल्याचे आमिरने सांगितले.
देशात परदेशी भाषा ज्या तंत्रज्ञानाच्या साहय्याने शिकविल्या जातात त्या तंत्रज्ञानाच्या साह्यानेच मराठी भाषा अन्य भाषकांना शिकविली जावी या उद्देशाने विद्यापीठाच्या जर्मन विभागातील प्रा. वीभा सुराना आणि राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी हा प्रकल्प हाती घेतला. हा अभ्यासक्रम सहा पातळय़ांचा आहे. एका पातळीचा अभ्यास संच तयार करण्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च आहे. आणखी पाच पातळय़ांचा अभ्यास संच तयार करायचे असून यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ. राजन वेळूकर, सुहास लिमये, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, जर्मनीचे वाणिज्य दूत मायकेल झीबर्ट आदी उपस्थित होते.