मराठी चित्रपटांना ‘प्राइम टाइम’ शो मिळत नाहीत, ही चित्रपट निर्मात्यांची तक्रार होती. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमधून मराठी चित्रपटांना ‘प्राइम टाइम’ शो देणे सक्तीचे करत सरकारने चित्रपट निर्मात्यांची तक्रार दूर केली खरी.. मात्र, एकाच वेळी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कोणकोणत्या चित्रपटांना ‘प्राइम टाइम’ द्यायचा, यावरून वाद सुरू झाले आहेत. ‘प्राइम टाइम’चे शो दिले तरीही चित्रपटाला प्रेक्षक संख्या कमी असल्याने शो उतरवण्याची नामुष्की चित्रपट निर्मात्यांवर येते आहे. मराठी चित्रपटांना प्रेक्षकोंनी पाठिंबा देणं ही त्यांची जबाबदारी आहे, असं तमाम चित्रपटकर्मी सांगतात. मात्र एकाच वेळी तीन चित्रपट, आधीच्या आठवडय़ात चांगले चालणारे चित्रपट अशी ही संख्या वाढती असेल तर प्रेक्षक किती-किती चित्रपटांसाठी खर्च करणार? हा व्यवहारी मुद्दा उरतोच. मुळात मराठी चित्रपटांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. ५२ आठवडय़ांमध्ये प्रदर्शित होणारे ११० मराठी चित्रपट हे समीकरण नीट बसवलं तरच ‘प्राइम टाइम’च्या निर्णयाचा खरा फायदा मराठी चित्रपट निर्मात्यांना होऊ शकतो..
या आठवडय़ात चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित, राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘कोर्ट’ हा चित्रपट, ‘ते दोन दिवस’ आणि ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ असे तीन नवीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. याशिवाय, प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘कॉफी आणि बरंच काही’ हा चित्रपट चांगला असल्याने तिसऱ्या आठवडय़ातही तो सुरू आहे. क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘काकण’ या चित्रपटाचाही दुसरा आठवडा सुरू आहे. त्यामुळे एकाच वेळी पाच मराठी चित्रपट असल्यानंतर ‘प्राइम टाइम’ कोणा-कोणाला मिळणार? दुसरा आठवडा असल्याने ‘काकण’चे शो कमी झाले. त्यांनी हा मुद्दा धरून पुन्हा ‘प्राइम टाइम’ शो मिळत नसल्याची तक्रार केली. चित्रपट वितरक समीर दीक्षित यांच्या मते, हे वाद वाढतच जाणार आहेत. प्रत्येक चित्रपट निर्मात्याला ‘प्राइम टाइम’चे शो हवे असतात. त्यात एकाला मिळाले, दुसऱ्याला मिळाले नाहीत की ओरड होणारच. मुळात ५२ आठवडे आणि शंभर सिनेमा असं गणित जरी धरलं तरी आठवडय़ाला दोन चित्रपट प्रदर्शित व्हायला हवे आहेत. मात्र याबाबतीत निर्मात्यांचं काहीच व्यवस्थापन नाही. जे मोठे बॅनर आहेत किं वा नामांकित दिग्दर्शक आहेत ते त्यांच्या चित्रपटांसाठी सहा-सहा महिने आधी नियोजन करतात. मात्र मराठीत हौशी चित्रपट निर्मात्यांची संख्या जास्त आहे, असं समीर दीक्षित सांगतात. एकाच वेळी पाच चित्रपट म्हटल्यावर प्रेक्षक विभागला जाणार आणि त्यात निर्मात्यांचंच नुकसान होणार, हे जाहीर असूनही ‘आमचा सिनेमा वेगळा आहे’, ‘मुहूर्ता’च्या तारखा अशा अनेक कारणांमुळे चित्रपटांच्या तारखा मागे-पुढे करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक तयारच होत नाहीत. त्यामुळे कधी कधी दोन-दोन आठवडे नवीन सिनेमा प्रदर्शितच होत नाही. यासाठी चित्रपट निर्माते, वितरक आणि चित्रपटगृह मालक एकत्र येऊन निर्णय घेऊ शकतील, अशी व्यवस्था असायला हवी, असं मत समीर दीक्षित यांनी मांडलं.
मात्र, मराठीत इतके चित्रपट प्रदर्शित होतात ही चांगलीच गोष्ट आहे. फक्त चित्रपटगृह मालकांनी नव्या चित्रपटांना व्यवस्थित शो दिले पाहिजेत म्हणजे सगळे सेट होईल, असा मुद्दा काही निर्माते मांडतात. कसे आहे, सरकारने ‘प्राइम टाइम’ शो देणे सक्तीचे केल्याने आम्हाला दुपारी १२ पासून ते रात्री नऊ दरम्यानचे शो तर मिळायला लागले. आता तीन नवीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यात ‘कोर्ट’ राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आहे. त्याला दिवसभराचे शोज मिळणारच. ‘कॉफी आणि बरंच काही’ला तिसऱ्या आठवडय़ातही ५५ ते ६० शोज आहेत. त्यामुळे दर शुक्रवारी नवीन प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना प्राधान्याने ‘प्राइम टाइम’चे शोज मिळाले पाहिजेत. आणि दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ातही सुरू असणाऱ्या चित्रपटांना विभागून शोज चित्रपटगृह मालकांनी दिले पाहिजेत, असे एका प्रथितयश निर्मात्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पण कोणत्या चित्रपटाला कोणता ‘प्राइम टाइम’ हवा हे ठरवणार कोण? हा मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायचीसारखा प्रश्न मराठी चित्रपटकर्मीच्या मनात रेंगाळतोच आहे. मोठय़ा किंवा नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी ‘प्राइम टाइम’ हा मुद्दा उरत नाही. सरकारने सक्ती करण्यापूर्वीही चांगल्या चित्रपटांना चांगली ओपनिंग मिळत होती.. असे मत एका वितरकाने व्यक्त केले. आपला चित्रपट नेमक्या कोणत्या प्रकारच्या प्रेक्षकांसाठी आहे आणि त्याला कुठला ‘प्राइम टाइम’ योग्य ठरेल, याचा विचार संबंधित चित्रपट निर्माते आणि वितरकांनी करायलाच हवा. ‘कॉफी आणि बरंच काही’ हा युथफुल सिनेमा आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणींची या चित्रपटाला जास्त गर्दी असणार. आणि ही मुलं दुपारचे शो पाहणे पसंत करतात. रात्रीचा शो पाहणं प्रत्येक मुलाला शक्य नाही, हे लक्षात घेऊन दुसऱ्या आठवडय़ातच निर्माता-दिग्दर्शकांनी आपल्याला हवे तसे शो विभागून घेतले आहेत.
त्यामुळे चित्रपटाला अपेक्षित तो परिणाम साधता आला असल्याचे उदाहरण या वितरकांनी दिले.
‘प्राइम टाइम’ म्हणजे कुठल्या वेळेतला शो याचा खरंच गंभीरपणे विचार झाला पाहिजे. आधी ६ ते ९ ही ‘प्राइम टाइम’ वेळ सांगण्यात आली होती. ते खरंच सगळ्यांच्या अंगाशी आलं असतं, असा मुद्दा ‘एस्सेल व्हिजन’चे व्यवसायप्रमुख निखिल साने यांनी मांडला. मराठी चित्रपटांची संख्या वाढणं हे चांगलंच लक्षण आहे. एकावेळी पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, हे चित्रही इथे दिसलंच पाहिजे की, मात्र चित्रपट प्रदर्शित कधी करायचा, याबद्दल नियोजन हवंच असं साने म्हणतात. ‘टाइमपास २’साठी मेची तारीख आम्ही गेल्या सप्टेंबरमध्येच निश्चित केली होती आणि त्यानुसारच सगळी निर्मितीची प्रक्रिया पार पडली  आहे. ‘कटय़ार काळजात घुसली’ हा संगीत विषयावरचा चित्रपट असल्याने त्याला दिवाळीच्या उत्सवी वातावरणात पाहणं प्रेक्षक पसंत करतील या विचाराने आम्ही नियोजन करत आहोत. शेवटी चित्रपटगृहांसाठीही हे व्यवसायाचे समीकरण जमून आलं पाहिजे, तरच चित्रपटाचा फायदा होईल, असं निखिल साने यांनी सांगितलं. दक्षिणेत वितरक आणि निर्मात्यांची संघटना आहे. वर्षभरात कुठला चित्रपट कधी प्रदर्शित होणार याचं नियोजन चित्रपटगृह मालकांच्या मदतीने ही संघटना करते. सेन्सॉरचे प्रमाणपत्र असलेल्या आणि प्रदर्शनासाठी तयार असलेल्या चित्रपटांनाच तारखा दिल्या जातात. त्यातही पहिला येणाऱ्याला पहिली संधी, असा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटासाठी सहा महिने आधी तारखा निश्चित करून घ्या, असे तिथे सांगितले जाते. अशी व्यवस्था आपल्याकडे हवी, असे समीर दीक्षित सांगतात. मुळात ‘प्राइम टाइम’चे शोज सरसकट मिळाले असले तरी कुठल्या वेळी आपल्या सिनेमाला प्रेक्षक संख्या जास्त आहे हे लक्षात घेऊन निर्माते, मल्टिप्लेक्स मालक यांनी नियोजन केले, तरच या निर्णयाचा फायदा सगळ्यांना होऊ शकतो.