मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक महत्त्वाचा चित्रपट म्हणून ‘सामना’ चित्रपटाची ओळख आहे. १९७५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाचा ‘सामना’ हेही या चित्रपटाचे ठळक वैशिष्टय़. चित्रपटांच्या चाळिशीनिमित्ताने फुटाणे यांच्याशी ‘सामना’चा आजच्या काळातील संदर्भ काय हे जाणून घेतानाच आजच्या आघाडीच्या दोन अभिनेत्यांना ‘सामना’सारख्या चित्रपटाचे आज काय महत्त्व वाटते हे समजून घेण्याचा प्रयत्न ‘रविवार वृत्तांत’ने केला.

ग्रामीण राजकारणावर चित्रपट तयार करायचा या उद्देशाने ‘सामना’ची निर्मिती करण्यात आली होती. चित्रपटातून सत्ता आणि बुद्धी यांच्यातील संघर्ष उभा केला होता. आणि आज चाळीस वर्षांनंतरही सत्ता आणि बुद्धीच्या या संघर्षांत काही खास बदल झालेला नाही. त्यामुळे ‘सामना’ आजही तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन या चित्रपटाचे निर्माते व ज्येष्ठ हास्य कवी रामदास फुटाणे यांनी केले.
चित्रपट निर्मितीच्या वेळेस मी चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी करत होतो. दादा कोंडके यांच्याबरोबर ‘सोंगाडय़ा’, ‘एकटा जीव सदाशिव’ या चित्रपटाच्या निर्मितीत काम केले होते. यापेक्षा काहीतरी वेगळे करावे, असा उद्देश माझ्या डोळ्यासमोर होता. महाराष्ट्राचे ग्रामीण राजकारण, सहकार व साखर सम्राट, सत्तासंघर्ष अशा विषयावर चित्रपट तयार करावा, याच उद्देशाने मी विजय तेंडुलकर यांना भेटलो. सुरुवातीला ते लेखनासाठी तयार नव्हते. पण, नंतर ते तयार झाले. १९७१ ते ७३ या कालावधीत तेंडुलकर यांनी तीन वर्षे अभ्यास केला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ते फिरले. तेथील समाजकारण व राजकारण जवळून पाहिले आणि त्यानंतरच लेखन केले. डॉक्टर श्रीराम लागू व निळू फुले यांना घ्यायचे हे मी अगोदरच नक्की केले होते, असेही फुटाणे यांनी सांगितले.
चित्रपटाचा विषय चाळीस वर्षांनतरही ताजा आणि आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीला लागू होतो, याचे कारण काय?, या प्रश्नावर फुटाणे म्हणाले, सत्ता मिळविणे, ती टिकविणे, स्वत:चे अस्तित्व राखणे आणि सत्तेसाठी जे काही करावे लागते त्यासाठी कोणत्याही थराला जाणे ही राजकारण्यांची मूलभूत प्रवृत्ती चाळीस वर्षांपूर्वीही होती आणि आजही आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. चित्रपटांत स्वातंत्र्यसैनिकाची निर्भयता आणि बुद्धिवंतांची लाचारी असे दोन्हींचे मिश्रण ‘सामना’मध्ये आहे. राजकारणातील खेळाडूंची नावे बदलली असली तरी खेळ तोच आहे, त्यामुळे काळ बदलला तरी राजकारण्यांची मूलभूत प्रवृत्ती बदलली नसल्याने तसेच  विषय चिरंतन असल्याने ‘सामना’ आजही ताजा वाटतो.
आजच्या तरुण पिढीपर्यंत ‘सामना’ वेगवेगळ्या स्वरूपात पोहोचला आहे. ‘यु टय़ूब’वर चित्रपट पाहता येऊ शकतो. चित्रपटाच्या डीव्हीडींना आजही मागणी आहे.
आजच्या काळात पुन्हा ‘सामना’ केला तर फक्त काही संदर्भ बदलावे लागतील. चित्रपटाचा मूळ गाभा सत्ता आणि बुद्धी यांतील संघर्ष कायमच असेल, असेही फुटाणे यांनी सांगितले.
शब्दांकन – शेखर जोशी
‘सामना’ ही आजच्या काळातील फॅण्टसी वाटते – गिरीश कुलकर्णी
‘सामना’ चित्रपटात दाखविलेली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आजही तशीच आहे. यात काहीही बदल झालेला नाही. चित्रपटात मास्तर आणि हिंदुराव यांचा संवाद दाखविला आहे. आजच्या काळात त्या दोघांमध्ये संवाद होणे संभवत नाही. नैतिकतेच्या बळावर समाज व राजकारणावर कोणाचा वचक आहे, असे चित्र समाजात आज पाहायला मिळत नाही. राजकीय व्यवस्था ही बेलगाम आणि वेगळ्या वाटेने जाऊ पाहात असून समाजाची ही दुरवस्था चिंताजनक आहे. ‘सामना’ ही आजच्या काळातील फॅण्टसी वाटते.
समाजात वावरताना राजकीय, सामाजिक, आर्थिक, नैतिक व्यवस्थेबाबतचे धक्के वारंवार बसत आहेत. वरकरणी सर्व समाज सुखलोलूप वाटत असला तरी सर्वसामान्य माणूस आजही साध्या साध्या गोष्टींपासून वंचित राहिला आहे. त्याचे अधिकार मारले जात आहेत. इंटरनेट, यू टय़ूबच्या माध्यमातून ‘सामना’ आजच्या पिढीने पाहिला असला तरी चित्रपटातील आशय, त्यातील सौंदर्य, चित्रपटाचे महत्त्व आजच्या तरुणांपर्यंत पोहोचले आहे, असे मला वाटत नाही. ‘सामना’ आजच्या काळात करायचा झाला तर तो आजच्या परिस्थितीचा विचार करून आणि नव्याने गोष्ट तयार करून निर्माण करावा लागेल. ‘सामना’सारखे आशयघन आणि दर्जेदार चित्रपटातून आमच्यासारख्या कलाकारांना सतत नवीन ऊर्जा मिळते आणि त्यामुळे काळाची बंधने ओलांडूनही असे चित्रपट टिकून राहतात.
‘सामना’ आजच्या काळात करायचा झाला तर नवी पिढी त्याची नव्याने मांडणी करेल – नंदू माधव
‘सामना’ चित्रपटात दाखविलेल्या सामाजिक व राजकीय परिस्थितीपेक्षाही आजची परिस्थिती अधिक चिंताजनक व दारूण झाली आहे. त्यावेळचा राजकारणी हा सहकार किंवा साखर सम्राट, जमीनदार असा होता. आजचा राजकारणी ‘लॅण्डमाफिया’, विविध उद्योगधंदे व पेट्रोलपंप आपल्या ताब्यात घेणारा झालेला आहे. पूर्वीचे राजकारणी हे लांबून समाजाची पकड घेत होते आजचे राजकारणी हे थेट पकड घेत आहेत.
गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी टोळ्या कमी झाल्या. पण राजकारणाचे गुन्हेगारीकरण व गुन्हेगारीचे राजकारण झाल्यामुळे थेट गुन्हेगारच राजकारणी झाले. सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली असल्याचे पाहायला मिळते. एकूणच सामाजिक व राजकीय परिस्थिती रसातळाला गेली आहे, जात चालली आहे. ‘सामना’ चित्रपटातील ‘मास्तर’ या टोपीखाली दडलंय काय, असा प्रश्न विचारतात. गांधी टोपीकडे पवित्र, नीतिमत्ता, सचोटी, खरेपणा याचे प्रतीक म्हणून पूर्वी पाहिले जात होते. नंतरच्या राजकारणात त्याचे संदर्भ बदलले. ती बदनाम झाली. मात्र आता तीच टोपी सर्वसामान्य माणसांच्या डोक्यावर आली असून काही नवीन बदल घडविला जात आहे. कपाळाला लावण्यात येणारा गंधाचा टिळा हा सालसता, पापभीरूपणा यांचे प्रतीक समजला जात होता. आता गंधाचा आकार वाढला आणि तो हिंस्त्रतेकडे गेला  आहे.
‘सामना’ या चित्रपटाशी मी निगडित नसलो तरी सतीश आळेकर यांच्या ‘दुसरा सामना’ या नाटकात मी काम केले होते. आळेकर यांनी ‘सामना’मधलीच परिस्थिती वेगळ्या पद्धतीने मांडली होती. पण ‘सामना’मध्ये जे काही दाखविले होते, त्यापेक्षाही आजचे वास्तव अधिक दाहक आहे. आजचा राजकारणी वेगळ्या पद्धतीने आणि मार्गाने आपले वर्चस्व टिकविण्याचा प्रयत्न करतो आहे.
बर्लिन महोत्सवात गेलेला ‘सामना’ हा पहिला मराठी चित्रपट होता. त्यानंतर ३६ वर्षांनंतर ‘विहिर’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट बर्लिन महोत्सवात दाखल झाला. ‘सामना’ चित्रपटातील एकूणच मांडणी मला ‘मेलोड्रामा’ पद्धतीची वाटते. आजची तरुण पिढी ही परिणाम तपासणारी आहे. त्यामुळे ‘सामना’ आजच्या काळात करायचा झाला तर नवी पिढी नक्कीच नव्या पद्धतीने याची मांडणी करेल.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर