बॉलिवूडचे नायक चित्रपटातील आपल्या भूमिकांबद्दल फारच गांभिर्याने विचार करू लागले आहेत. एखादी आव्हानात्मक भूमिका मिळवण्यापासून ते तशी भूमिका हातात आल्यानंतर त्याचे लुक्स, भाषा, पेहराव असा सर्वागीण अभ्यास करण्यावर त्यांचा भर असतो. म्हणूनच की काय एरव्ही मुंबईत स्वत:ची गाडी आणि इतर वेळी विमानाप्रवास करत फिरणारा वरूण धवनसारखा आजच्या पिढीचा अभिनेता चित्रपटाच्या निमित्ताने का होईना ट्रेनमधून मुंबईतील बदलापूर नामक सुदूर उपनगरात पोहोचला.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा ‘स्टुडंट’ असलेल्या वरूण धवनने काही रोम-कॉम चित्रपटांनंतर आपला मोर्चा थोडय़ा वेगळ्या भूमिका असलेल्या चित्रपटांकडे वळवला आहे. करण जोहर आणि वडील डेव्हिड धवन यांचे चित्रपट केल्यानंतर वरूण चक्क वेगळ्या विषयांवरचे चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा चित्रपट करतो आहे. राघवनचा ‘बदलापूर’ हा चित्रपट वरूणच्या कारकिर्दीतला महत्वाचा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटातील आपली भूमिका चपखलपणे वठवण्यासाठी तो जीवापाड मेहनत करतो आहे. चित्रपटाच्या नावात ‘बदलापूर’ असले तरी आत्तापर्यंत वरूण धवनचा बदलापूरशी दुरूनही संबंध आला नव्हता. मात्र, या चित्रपटासाठी म्हणून वरूणला बदलापूर सफर घडवायची असा विडाच जणू श्रीराम राघवन आणि त्यांचे कॅमेरामन अनिल मेहता यांनी उचलला होता.
वरूण धवनच्या वाढदिवसाच्या दिवशीच या जोडीने त्याच्या बदलापूरला जाण्याची मोहिम आखली. सकाळी लवकर मुंबई-पुणे एक्स्प्रेस पकडून नेहमीच्या गर्दीत बदलापूरला पोहोचायचे, त्यात वरूणला कुठल्याही प्रकारची सुरक्षा देण्यात येणार नव्हती. वरूणचा चित्रपटातील लुकच वेगळा असल्याने तो नेहमी दाढीत वावरतो. त्यामुळे, गर्दीत काही मोजके लोक वगळता त्याला फोरसे कोणी ओळखणार नाही, असा अंदाज निर्मात्यांनी बांधला. आणि कोणालाही कळणार नाही इतक्या सहजतेने चित्रण करण्याची योजना त्यांनी आखली. वरूणला गाडीत काही लोकांनी ओळखलेही खरे.. पण, तो वरूणच आहे यावर त्यांचा विश्वाच बसत नसल्याने त्यांनी थेट हा प्रश्न विचारण्याचे टाळले. वरूणने मात्र सहप्रवाशांबरोबर चांगल्याच गप्पा मारल्या, अशी माहिती राघवन यांनी दिली.
लोकलच्या गर्दीत चित्रिकरण करणे शक्य नव्हते. त्यामुळे चित्रपटातील हे महत्वाचे दृश्य एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चित्रित करण्यात आले. ऐन गर्दीत वरूणने दादरहून एक्स्प्रेस पकडली आणि तो बदलापूरला पोहोचला. त्यानंतर बदलापूरमध्ये चित्रिकरण करण्यात आले. चित्रपटासाठी का होईना वरूण धवन बदलापूरला पोहोचला.