शाळेत शिकणारी १६ वर्षीय ओडिसा येथील मुलगी वरुणला भेटण्यासाठी तसेच बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनण्यासाठी घरुन पळाली आणि तिने थेट मुंबई गाठली. ती तीन दिवस मुंबईतल्या रस्त्यांवर फिरत होती. मुंबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिने आपली संपूर्ण माहिती सांगितली. कटकमध्ये ती आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहते. १० दिवसांपूर्वी आई- वडिलांना न सांगता ती घरातून निघाली आणि मुंबईसाठीची ट्रेन पकडली. तिच्या पालकांनी कटक इथल्या लालबाग पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. त्यानंतर कटकहून पोलिसांची एक टीम मुंबईला तिला पकडण्यासाठी पोहचली. तिच्या जवळ तिचा फोन असल्यामुळे तिचा माग घेत कटक पोलीस मुंबईपर्यंत आले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत पोहोचल्यानंतर ती रस्त्यांवरच फिरत होती. या दरम्यान तिने तिचा मोबाईल बंद ठेवला नव्हता. जेव्हा ती मुंबईला पोहोचली तेव्हा तिच्या आईने तिला फोन करुन घरी परत येण्यास सांगितले. पण यावर तिने आईलाच धमकी दिली की त्यांनी जर तिला परत घरी यायला सांगितले तर ती आत्महत्या करेल. तीन दिवस मुंबईमध्ये राहिल्यानंतर ती गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये गेली. तिथे तिला बॉलिवूड अभिनेता वरुण धवन भेटेल अशी अपेक्षा होती. कटकचे उपायुक्त संजीव अरोरा यांनी सांगितले की, मुंबईमध्ये ही मुलगी अनेक लोकांच्या संपर्कात होती, ज्यांनी तिला अभिनेत्री बनण्याचे आश्वासन दिले होते.

मुलगी बेपत्ता झाल्याच्या तीन दिवसांनंतर लगेच मुंबई पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. तोपर्यंत तिचे पालक आणि कटक पोलिसही मुंबईत पोहोचले होते. पोलिसांनी मुलीच्या आईला, मुलीला फोन करुन एकदा भेटण्यासाठी येण्याची विनंती करायला सांगितली. तेव्हा मुलीला सांताक्रुझ येथील अंतरर्देशीय विमानतळाच्या इथे भेटायला बोलावले. ती पोलिसांना पाहून परत पळून जाऊ नये यासाठी पोलिसही तिथे सामान्य कपड्यात हजर होते.

मुलीला पकडल्यानंतर तिला विमानतळ येथील पोलीस स्थानकात नेण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीला पकडल्यानंतर तिचा मोबाइल पूर्णपणे तपासण्यात आला. यातून ती मुंबईला आल्यानंतर कोणाकोणाला भेटली तसेच मुंबईमध्ये नंतर कुठे जाणार होती याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांना मुलीच्या मोबाइलमध्ये मुंबईला येणाऱ्या ट्रेनची माहिती तसेच वरुण धवनला भेटण्यासाठी शोधलेल्या फिल्मसिटीचा पत्ता मिळाला.