बिहारमधील एका दिग्दर्शकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकास अजेंडावर चित्रपट बनविला आहे. मात्र, हा चित्रपट बिग बजेट नाही. यात टीव्ही अभिनेता चंद्रमणि एम. आणि जेबा. ए हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. सुरेश झा यांनी चित्रपटाती निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटाबाबत बोलताना सुरेश झा म्हणाले की, ‘मोदी का गाव’ या सव्वा दोन तासाच्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून त्याच्या प्रदर्शनापूर्वीचे काम चालू आहे. हा चित्रपट बायोपिक नसला तरी याचे मेगा प्रिमीयर करण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यासाठी आम्ही पंतप्रधानांना बोलवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होण्याची आणि बिग हीट ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘मोदी का गाव’ चित्रपटात नरेंद्र मोदींसारखे दिसणारे मुंबईतील व्यावसायिक विकास महांते यांनी मोदींची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बिग बजेट नसून यात टीव्ही अभिनेता चंद्रमणि एम. आणि जेबा. ए हे भूमिका साकारताना दिसतील. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण पटणा, दरभंगा आणि मुंबईत करण्यात आले आहे. चित्रपटासाठी संगीतकार मनोजानंद चौधरी याने सात गाणी कंपोज केली आहेत. तसेच, या चित्रपटाची सह निर्मिती तुषार ए. गोयल याची आहे.

दरम्यान, निश्चलनीकरणावरून संसदेत गदारोळ करणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लक्ष्य केले. निश्चलनीकरणाबाबत लोकसभेत बोलण्यास तयार असूनही विरोधक बोलू देत नसल्याने ‘जनसभे’त बोलणे भाग पडत असल्याचे स्पष्ट करत मोदी यांनी संसदेतील कोंडीचे खापर विरोधकांवर फोडले. त्याच वेळी निश्चलनीकरणामुळे नागरिकांना आणखी काही दिवस त्रास होणार असला तरी निर्णयापासूनच्या ५० दिवसांनंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

गुजरातमध्ये बनासकांठा येथे एका कार्यक्रमात मोदींनी निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे समर्थन करतानाच विरोधकांवर टीकास्त्र सोडले. संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार नेहमीच तयार आहे. मात्र विरोधकांचा खोटारडेपणा उघडा पडेल, या भीतीने ते संसदेचे कामकाज चालू देत नाहीत, असा आरोप मोदी यांनी केला. पंतप्रधान या मुद्दय़ावर बोलण्यास तयार असल्याचे आश्वासन सरकारने देऊनही विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. त्यामुळेच मी ‘जनसभे’त बोलण्याचा निर्णय घेतला. मात्र संधी मिळताच मी देशातील १२५ कोटी लोकांचा आवाज लोकसभेत उठवेन, असे मोदी म्हणाले. संसदेतील गोंधळाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलेल्या नाराजीकडेही त्यांनी लक्ष वेधले.