‘भिकारी’ सिनेमातील ‘देवा हो देवा’ हे श्रीमंत गाणे प्रदर्शित

मी मराठा एण्टरटेन्मेन्टचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ या बहुचर्चित सिनेमाचे नुकतेच ‘देवा हो देवा’ हे भव्य गाणे प्रदर्शित करण्यात आले. गणपतीवर आधारित असलेले हे गाणे मराठी गाण्याच्या चित्रीकरणात सर्वात श्रीमंत गाणे ठरत आहे. अंधेरी येथील पी वी आर आयकॉनमध्ये सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत रंगलेल्या या शानदार सोहळ्यात, बॉलिवूडस्टार आलिया भट आणि वरूण धवन यांची उपस्थिती आकर्षणाचा विषय ठरला. या दोघांनी स्टेजवर येत, मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शकीय पदार्पण करणारा डान्समास्टर गणेश आचार्य याला चीअर-अप करण्यासाठी डान्सदेखील केला.

वाचा : सैफची ही बहिण आहे २७०० कोटींची मालकीण

अखंड बॉलिवूडला आपल्या ठेकात नाचवणारी गणेश आचार्य याच्या शैलीतले ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ या सिनेमातील हे गाणे, बॉलिवूड गाण्यांना लाजवेल इतके भव्य-दिव्य असल्याचे पाहायला मिळते. गणेशावर आधारित असलेल्या या गाण्याच्या चित्रीकरणासाठी पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीमध्ये इतका मोठा तामजाम आखलेला दिसून येतो. ‘देवा हो देवा’ असे बोल असलेल्या या गाण्यातून ३५ फूट उंच भव्य गणेशमूर्तीचे दर्शन आपल्याला होते. या गाण्यात तब्बल एक हजार कलाकार थिरकताना दिसून येतात. अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री ऋचा इनामदार, गुरु ठाकूर आणि कीर्ती आडारकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे विकी नागर आणि प्रसन्न देशमुख यांनी शब्दबद्ध केले आहे, तर या गाण्याचे बोल सुखविंदर सिंग आणि दिव्य कुमार यांनी गायले आहेत. संगीत दिग्दर्शक मिलिंद वानखेडे यांनी या गाण्याला ताल दिला असून, यात ढोलताशा, झांजा तसेच सतार या वाद्यांचादेखील वापर करण्यात आला आहे. शिवाय, सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि भिकारी सिनेमाचे डीओपी महेश लिमये यांच्या कॅमेऱ्यात हा भव्य डोलारा चित्रबद्ध झाला असल्यामुळे,  हे गाणे सगळयाच बाबतीत समृद्ध ठरत आहे. विघ्नहर्त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात गजर करणारे.’भिकारी’ सिनेमातील हे गाणे येत्या गणेशोत्सवात गणेशभक्तांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

वाचा : सुहाना आणि धर्माविषयी शाहरुख म्हणतो…

l-r-rucha-inamdar-varun-dhawan-alia-bhatt-ganesh-acharya-and-swwapnil-joshi

येत्या ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा सिनेमा आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा आहे. या सिनेमाची कथा शशी यांची असून पटकथा, संवाद आणि गीत गुरु ठाकूर यांनी लिहिली आहे. आगामी ‘भिकारी’ या सिनेमाद्वारे सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा हे कलाकारदेखील आपापल्या भूमिकेतून प्रेक्षकाचे मनोरंजन करण्यास येत आहे.