बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये आलिया बद्रीच्या दुल्हनियाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटामध्ये दुल्हनियाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आलियाने तिला आयुष्य़ात हव्या असणाऱ्या जोडीदाराविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. एका मुलाखतीमध्ये आलियाने तिच्या भावी जोडीदार कसा असावा ही इच्छा बोलून दाखविली. माझा आयुष्याचा सोबती चांगला मित्र असावा, आमच्या दोघांचे विचार एकमेकांसोबत मिळायला हवेत, असे आलियाने म्हटले आहे.  आलिया तिच्या भावी पतीविषयीच्या अपेक्षा सांगताना कामाला प्राधान्य देताना देखील दिसून आले. मी माझ्या कामावर खूप प्रेम करते. त्यामुळे लग्न तसेच मुलांच्या जन्मानंतर चित्रपट करणे सोडून देईल असे वाटत नाही. त्यामुळे आयुष्याची साथ देणाऱ्या माझ्या भावी पतीने  माझ्यासोबत माझ्या कामालाही महत्त्व द्यावे, अशी इच्छा तिने बोलून दाखविली.

लग्नासंबंधी बोलताना आलियाने प्रेम विवाहाला पसंती दिली. जोडीदाराला लग्नापूर्वी समजून घ्यायचे असेल तर ठरवून लग्न केल्यास हे साध्य होणार नाही. कारण तुमचे आणि तुमच्या भावी जोडीदाराचे विचार आई-वडिलांना समजणे अशक्य असेच आहे.  त्यामुळेच मी स्वत: मुलगा पसंत करुन त्याच्यासोबत लग्न करेन, असे आलिया म्हणाली. सध्या बॉलिवूड वर्तुळात सिद्धार्थ आणि आलिया यांच्या प्रेमसंबंधाविषयी चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते. नुकतेच सिद्धार्थने दिलेल्या मुलाखतीमध्ये सिद्धार्थचे आलिया प्रेम पुन्हा एकदा दिसून आले होते. बी टाऊनमधील सर्वाधिक सुरक्षित अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सिद्धार्थला विचारण्यात आला होता. यावर सिद्धार्थने आलिया भट्टचे नाव सांगितले होते. मी आलियाला बॉलिवूड पदार्पणाच्या पहिल्या दिवसांपासून ओळखतो. असे सिद्धार्थ म्हणाला. बॉलिवूडमधील अद्भभूत व्यक्तिमत्वापैकी आलिया एक असल्याचे सांगत सिद्धार्थने आलियाचे कौतुक केले होते. आलिया समविचारी असल्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी तिच्यासोबत शेअर करतो, असेही सिद्धार्थ म्हणाला होता. आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘स्टूडण्ट ऑफ द इयर’ आणि ‘कपूर अॅण्ड सन्स’ या दोन चित्रपटांमध्ये ही जोडी झळकली होती.

‘डिअर जिंदगी’मधील आपल्या अभिनयाने प्रशंसेस पात्र ठरलेली आलिया ‘आशिकी ३’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आलिया आणि सिद्धार्थ हे पडद्या बाहेरचे प्रेमी जोडपे पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र आले तर ‘आशिकी ३’ची लोकप्रियता आणखीनच वाढेल, अशी आशा चित्रपट निर्मात्यांना आहे.