‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेद्वारे कैवल्यची भूमिका साकारणारा अभिनेता अमेय वाघ लवकरच एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अमेयने साकारलेली कैवल्यची भूमिका पाहता त्याला यामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. तेव्हा आता या लोकप्रियतेचाच फायदा घेत अमेय त्याच्या नव्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अमेय वाघ प्रेक्षकांना नेहमीच वेगळ्या अंदाजात दिसत आला आहे. मालिका, चित्रपट, नाटक, वेब सिरीज या सर्वच माध्यामातून अमेयने स्वत:च्या अभिनयाची अनोखी छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटविली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय कमी वेळात स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारा अमेय आता पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. पण, ही भूमिका काही कोणत्या चित्रपटातील किंवा नाटकातील नाही ह लक्षात घेण्याची बाब. अमेय लवकरच एका डान्स रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. या गोष्टीचा खुलासा नुकताच अमेयने केला आहे. कलर्स मराठी या वाहिनीवर येणाऱ्या ‘2 मॅड’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सर्वांचाच लाडका कैवल्य म्हणजेच अमेय वाघ सांभाळणार आहे. अमेयनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यासंबंधीचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे.

एका वेगळ्या स्वरुपाच्या या रिअॅलिटी शोला प्रेक्षकांची कितपत पसलंती मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, रिअॅलिटी शोच्या हल्लीच्या दिवसांमध्ये या कार्यक्रमाला प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवण्याचे चांगलेच आव्हान असणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाची आणि स्वत:ची लोकप्रियता जपण्यासाठी अमेय वाघ कोणत्या नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार हे येत्या ९ डिसेंबरला कळेलच. सोमवार आणि मंगळवारी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तेव्हा ‘लुझर सुद्धा विनर असतो जेव्हा त्याच्यात मॅडनेसचा फिव्हर असतो….’ असं म्हणणारा अमेय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो का? हे येत्या काही दिवसांमध्ये कळेलच.

दरम्यान, या कार्यक्रमाव्यतिरिक्त अमेय वाघ त्याच्या अतर प्रोजेक्ट्समध्येही व्यग्र आहे. ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाद्वारे अमेय आणि ‘दिल दोस्ती..’ची टीम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या नाटकाची निर्मिती अभिनेते सुनिल बर्वे यांनी केली असून नाटकात अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे यांची महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळत आहे.