‘स्टॅनली का डब्बा’ आणि ‘हवाहवाई’ यांसारख्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक अमोल गुप्ते आता पुन्हा एकदा लहान मुलांवर आधारित चित्रपट घेऊन येताहेत. या चित्रपटाचे नाव ‘स्निफ’ असे असून नेहमीप्रमाणेच मुख्य भूमिका साकारणारा लहान मुलगा विशेष आहे. कारण त्याच्याकडे एक विशेष शक्ती म्हणजेच ‘सुपरपॉवर’ आहे. ही ‘सुपरपॉवर’ म्हणजे दूरदूरपर्यंतचा वास घेण्याची शक्ती. याच विशेष शक्तीमुळे हा मुलगा संपूर्ण शहरात प्रसिद्ध होतो.

छोट्या सनी गिलच्या एका समस्येने चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. या मुलाची सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करत असतात, मात्र त्याचा नाक कोणताच वास घेऊ शकत नाही. यामुळेच आईवडिलांसोबतच घरातील सर्वजण त्याच्यासाठी चिंतेत असतात. अचानक शाळेत एके दिवशी प्रयोगशाळेत अशी काही रासायनिक प्रक्रिया होते ज्यामुळे सनीची वास घेण्याची क्षमता कित्येक पटींनी वाढते. ही अद्भुत शक्ती मिळाल्यानंतर सनीचे विश्वच बदलते. सोसायटीत, शाळेत सर्वत्र तो प्रसिद्ध होतो. या शक्तीचा वापर करून तो चोरांनाही पकडतो. मात्र नंतर हीच शक्ती त्याची डोकेदुखी ठरते. परिसरातील गुंडांच्या निशाण्यावर तो येतो. अशी अनेक रंजक दृष्ये ‘स्निफ’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात.

Jab Harry Met Sejal trailer : शाहरूख-अनुष्काची रोमॅण्टिक केमिस्ट्री

अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटात खुशमीत गिल, मनमीत सिंग, सुरेखा सीकरी आणि सुरेश मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.