एकदा का चेहऱ्याला रंग लागला की तो शेवटपर्यंत राहतो असं म्हणतात. मग तो कोणताही कलाकार असो त्याला स्वतःचं असं खासगी आयुष्य राहत नाही. वेळ प्रसंगी त्याला स्वतःला विसरून समोर असलेली कमिटमेंट पाळावी लागते. एखादा दुःखद प्रसंग घडला तर आपण त्या क्षणाला अगदी गळून पडतो. डोळ्यांसमोर अंधाही येते. पण कलाकारांना तसे करुन चालत नाही. ‘शो मस्ट गो ऑन’ या नियमाला अनुसरुन दुःखाचा कितीही मोठा डोंगर कोसळला असला तरी हातातलं काम पूर्ण करावंच लागतं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नुकतीच ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ऑफिसला भेट दिली. यावेळी त्यांनी भुतकाळातल्या आठवणींना उजाळा दिला.

अशोक सराफ आणि सुनील गावस्करांच्या ‘या’ नाटकाबद्दल तुम्हाला माहित आहे का?

‘तू सुखकर्ता’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये अशोक सराफ व्यग्र होते. पण त्याच वेळेत त्यांच्या बाबांची तब्येत खालावली होती. सिनेमाच्या प्रत्येक सीननंतर ते आपल्या भावाला फोन करुन बाबांच्या तब्येतीची चौकशी करायचे. प्रत्येक फोनला त्यांचा भाऊ त्यांना तब्येत ठीक असल्याचे सांगत होते. असाच एक सीन झाल्यावर त्यांनी भावाला फोन केला असता बाबांच्या मृत्युबद्दल त्यांना कळले. या अनुभवाबद्दल सांगताना अशोक सराफ म्हणाले की, ‘भावाने जेव्हा बाबा गेल्याचे सांगितले तेव्हा मी दोन मिनिटं पूर्ण हादरलो होतो.

मी चौकटचा नाही बदामचा राजा- अशोक सराफ

पण नंतर मी जे चित्रीकरण राहिले होते त्याबद्दल विचारले आणि चित्रीकरणाला सुरुवातही केली. बाबा गेल्याचे माहित असूनसुद्धा तेव्हा मला विनोदी दृश्य तितक्याच ताकदीने पडद्यावर उतरवायचे होते. हा क्षण मी कधीही विसरु शकत नाहीत. असे अनेक क्षण माझ्या आयुष्यात आले. माझ्याच काय अनेक कलाकारांच्या आयुष्यात असे अनेकक्षण येत असतात. एक कलावंत म्हणून जेव्हा चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतात तेव्हा तडजोडीही हातात हात धरून त्यांच्यासोबत येतात हे विसरायला नको.