‘बार बार देखो’ या चित्रपटातील ‘नचदे ने सारे’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. लग्नाच्या धामधुमीची पार्श्वभूमी असणाऱ्या या गाण्याने रसिकांनाही ताल धरायला भाग पाडले. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफचे धम्माल नृत्यही या गाण्यात दिसत आहे. जसलीन रॉयलने संगीतबद्ध केलेले हे गाणे हर्षदीप कौर आणि सिद्धार्थ महादेवन यांनी स्वरबद्ध केले आहे. काही काळापूर्वीच या चित्रपटाचे ‘काला चष्मा’ हे गाणे आणि चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. सध्या ‘काला चष्मा’ या गाण्याला बरीच पसंती मिळत असून या चित्रपटाच्या ट्रेलर पाहता सिनेरसिकांना चित्रपटाबाबत उत्सुकतालागून राहीली आहे.
करण जोहर, फरहान अख्तर, रितेश सिदवानी, सुनिल लुल्ला यांसारख्या नामवंतांची निर्मिती असणाऱ्या ‘बार बार देखो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नित्या मेहराने केले आहे. रोमॅंटिक ड्रामा असणाऱ्या या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून या बहुप्रतिक्षित चित्रपट एक वेगळेच कथानक हाताळताना दिसणार आहे. या चित्रपटाआधी सिद्धार्थ ‘कपूर अॅन्ड सन्स’ या चित्रपटात दिसला होता, तर कतरिना ‘फितूर’ या चित्रपटातून झळकली होती. आता हे दोन्ही कलाकार ‘बार बार देखो’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार असल्यामुळे बॉलीवुडमध्ये एका नव्या जोडीची भर पडणार आहे. कतरिना आणि सिद्धार्थची ‘सिझलिंग केमिस्ट्री’ असणारा ‘बार बार देखो’ हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.