मल्टिप्लेक्स, एकपडदा चित्रपटगृहांचे ६ ते ७ खेळ हाऊसफुल

गेल्या पाच महिन्यांचा तिकीटबारीवरचा दुष्काळ ‘बाहुबली २’च्या बुकिंगमुळे धुऊन निघेल, या विचाराने मल्टिप्लेक्स आणि एकपडदा चित्रपटगृहे व्यावसायिक सुखावली आहेत. जगभरात नऊ हजार आणि देशात साडेसहा हजार चित्रपटगृहांमधून झळकणाऱ्या ‘बाहुबली २’ या चित्रपटासाठी सोमवारपासूनच अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहेत. दक्षिणेत बऱ्याच ठिकाणी या आठवडय़ासाठीचे सगळे खेळ हाऊसफुल झाले असताना मुंबईतही शुक्रवारी कामाचा दिवस असूनही दिवसभराचे ७ ते १३ खेळ हाऊसफुल झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी ‘बाहुबली : द बिगिनिंग’ हा चित्रपट झळकला होता तेव्हा पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५० कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली होती. मात्र या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा आकडा पाहता या वेळच्या कमाईबद्दल निर्मात्यांसह सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

‘बाहुबली २’च्या प्रसिद्धीसाठी या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारपासूनच ‘बाहुबली १’ सगळीकडे प्रदर्शित करत निर्मात्यांनी वेगळी खेळी खेळली होती. गेले महिनाभर या ना त्या कारणाने ‘बाहुबली २’ सतत चर्चेत ठेवण्यात आला होता. या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग कधी सुरू होणार याबद्दलही प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत निर्मात्यांनी देशभरात टप्प्याटप्प्याने बुकिंगला सुरुवात केली. चेन्नई, हैदराबादमध्ये गेल्या शुक्रवारपासूनच अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात करण्यात आली होती. तिथे शुक्रवार ते रविवार तिन्ही दिवसांचे खेळ आधीच हाऊसफुल झाले आहेत. सोमवारपासून मुंबईतही अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये दिवसाला १३ ते २२ खेळ दाखवणार आहेत, तर एकपडदा चित्रपटगृहांमध्ये दिवसाला सहा खेळ दाखवण्यात येणार आहेत. शुक्रवारी सुट्टीचा दिवस नसतानाही निम्म्याहून अधिक खेळ हाऊसफुल झाले आहेत.

प्रचंड प्रतिसाद

  • कांदिवलीत पीव्हीआर चित्रपटगृहात दिवसाला १९ खेळ दाखवण्यात येणार आहेत. त्यांपैकी सात खेळ हाऊसफुल झाले आहेत.
  • घाटकोपरला आयनॉक्स चित्रपटगृहात २३ पैकी १३ खेळ हाऊसफुल आहेत.
  • विलेपार्लेत सनसिटीमध्ये ११ पैकी सहा खेळ हाऊसफुल आहेत.
  • मुलुंडमध्ये कार्निव्हल चित्रपटगृहात १५ पैकी सात खेळ हाऊसफुल्ल आहेत.
  • वाशीत रघुलीला मॉलमध्ये १९ पैकी १३ खेळ हाऊसफुल आहेत.
  • ठाण्यातही विवियाना मॉलमध्ये १५ पैकी नऊ खेळ हाऊसफुल आहेत.

‘बाहुबली २’ चित्रपटासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यापासून जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. एक तर या चित्रपटाच्या बरोबरीने दुसरा कुठलाच चित्रपट प्रदर्शित होत नाही आहे. त्यामुळे सध्या सकाळी ८.१५ पासून ते रात्री ११ पर्यंत खेळ वाढवण्यात आले आहेत. गुरुवारी बुकिंगमध्ये आणखी वाढ होईल.

नितीन दातार, अध्यक्ष, सिंगल स्क्रीन थिएटर्स असोसिएशन