दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा चित्रपट ‘बाहुबली’मधून सुप्रसिद्ध झालेला अभिनेता प्रभास लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ‘बाहुबलीसाठी’ गेल्या पाच वर्षांपासून प्रभास कठोर मेहनत करत होता आणि त्यासाठी त्याने अनेक चित्रपटांच्या ऑफरदेखील नाकारल्या. मात्र आता ‘बाहुबली’नंतर प्रभास बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटातून पदार्पण करणार असल्याची चर्चा होती.

प्रभास आता करण जोहरच्या चित्रपटातून नाही तर दिग्दर्शक साजिद नाडियादवालाच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये येणार असल्याचं म्हटलं जातंय. यासंदर्भात प्रभासने साजिदची दोनदा भेटही घेतल्याची चर्चा आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये चित्रपटाविषयी चर्चा झाली असून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय.

वाचा : सलमानने कापला ‘ट्युबलाइट’चा केक

दिग्दर्शक करण जोहरने नुकतंच स्पष्ट केलं होतं की प्रभासला घेऊन चित्रपट करण्याचा अद्याप काही विचार नाही. करणच्या घरी झालेल्या एका पार्टीमध्येही प्रभासने हजेरी लावली होती. यावेळी रणबीर कपूर, आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर आणि आदित्य रॉ़य कपूरसोबत यावेळी प्रभास आणि राणा डग्गुबतीसुद्धा उपस्थित होते.

वाचा : वरुण धवन प्रभासचा ‘वध’ करतो तेव्हा..

प्रभासला बॉलिवूडमध्ये भूमिका साकारताना पाहण्याची अनेकांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असली तरी दिग्दर्शक कोण असेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. सध्या प्रभास आपला आगामी चित्रपट ‘साहो’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट तामिळ, हिंदी आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून सुमारे १५० कोटी रुपयांच्या वर या चित्रपटाचा बजेट आहे.