‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये दररोज बऱ्याच घडामोडी घडत असतात. त्यातही ज्यावेळी सलमान खान बिग बॉसच्या घरात असलेल्या स्पर्धकांसोबत संवाद साधतो त्यावेळी बरेच खटकेही उडतात. बिग बॉसच्या ११ व्या पर्वातही अशा बऱ्याच घडामोडी घडत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरात जुबैर खान आणि सलमानमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी संतापलेल्या सलमानने जुबैरला खूप सुनावले होते. ‘मी तुझी कुत्र्यासारखी अवस्था करेन’, अशा शब्दांत सलमानने जुबैरचा पाणउतारा केला होता. त्यानंतर ‘दबंग खान’ने आपली माफी मागावी असं त्याने म्हटलं होतं.

त्यावर सलमानने माफी मागण्याच्या निमित्तानेही जुबैरला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. तो म्हणाला, ‘गेल्या आठवड्यात मी कुत्रा या शब्दाचा गैरवापर केला होता. त्याकरता जगातील सर्व कुत्र्यांची मी माफी मागू इच्छितो. कारण, ते तर खूप प्रामाणिक असतात. ते आपल्या मालकाची साथ कधीच सोडत नाहीत.’

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

साहजिकच आपल्यावर झालेली ही टीका ऐकून जुबैरचा पारा चढला. या वादग्रस्त घरातून बाहेर आल्यानंतर जुबैरने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधत आपला अनुभव सर्वांसमोर मांडला. ‘मी सलमान खानचे आभार मानू इच्छितो. कारण, त्याने आपल्या भावांची (कुत्र्यांची) माफी मागितली.’ त्याच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या. सलमान खानशी वाकड्यात शिरण्याचे परिणाम आजवर अनेकांनी पाहिले आहेत. तेव्हा आता हे वक्तव्य जुबैरच्या अंगाशी येणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाचा : ‘शोले’मध्ये ठाकूरची भूमिका साकारणार होते धर्मेंद्र, पण…