मराठी कलाकार, निर्माते-दिग्दर्शक अशा तरुण तुर्कापासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना कधी चिमटे काढत, कोपरखळ्या मारत त्यांना बोलते करणाऱ्या अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकरांचे कसब यापूर्वी अनेक चित्रपट महोत्सवांतून, कार्यक्रमांतून आपण पाहिले आहे. मात्र केवळ कलाकारांपुरते मर्यादित न राहता चित्रपटसृष्टीतील विविध विभाग सांभाळणारे तंत्रज्ञ, अन्य कुशल कलाकार यांनाही खास मांजरेकरी शैलीत बोलतं करण्याचा प्रयत्न ‘मांजा बोले’ या कार्यक्रमातून केला जाणार आहे.

सातासमुद्रापार पोहोचलेल्या मराठी चित्रपटाने आतापर्यंतच्या काळात अनेक विभागांमध्ये प्रगती केली आहे, मग ती तांत्रिक असो किंवा कथेच्या बाबतीत असो. डिजिटल मीडियावरही मराठी सिनेमाला व्यासपीठ मिळावं यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ ही नवी संकल्पना सुरू झाली आहे. या संकल्पनेला ‘ट्विटर इंडिया’ने पाठिंबा दिला आहे. ‘प्लॅनेट मराठी’ने डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मराठी सिनेमा तसेच सिनेमाशी निगडित कलाकार, तंत्रज्ञ लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ‘मांजा बोले’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. मुंबईतील ट्विटरच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत या आगळ्यावेगळ्या धमाल ‘चॅट शो’ची घोषणा करण्यात आली. महेश मांजेरकर या शोचं सूत्रसंचालन करणार असून डिजिटल माध्यमावर पहिल्यांदाच ते सूत्रधाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

सोशल मीडियावरून मराठी सिनेमाचे कलाकार-लेखक मंडळी त्यांच्या कलाकृतींविषयी भरभरून बोलू शकतील हा या शोमागचा मूळ उद्देश आहे. महेश वामन मांजरेकर आपल्या खास शैलीतून शोमध्ये येणाऱ्या कलाकारांना बोलतं करणार आहेत. ‘मांजा बोले’ या कार्यक्रमाची एक झलकही या वेळी दाखवण्यात आली. या पहिल्याच भागात ‘हृदयांतर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस तसेच अभिनेत्री सोनाली खरे यांच्याशी महेश मांजरेकर यांनी गप्पा मारल्या. महेश मांजरेकर यांच्या तिरकस प्रश्नांना या दोघांनीही तितकीच खुमासदार उत्तर दिली. ‘ट्विटर इंडिया’चे प्रमुख विरल जानी यांनी या कार्यक्रमाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर ‘प्लॅनेट मराठी’ भविष्यातही अनेक नवीन उपक्रम डिजिटल प्लॅटफॉर्मवर राबवणार असल्याची माहिती ‘प्लॅनेट मराठी’चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर यांनी दिली.