कोणताही महत्त्वाचा मुद्दा जनसमुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा कलात्मक वापर केला जातो. त्यापैकीच एक माध्यम म्हणजे जाहिरात. कला, तंत्रज्ञान आणि संकल्पना यांची सुरेख सांगड घालत आणखी एक जाहिरात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. एक महत्त्वाचा संदेश या जाहिरातीद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, त्यासाठी अनेक प्रसिद्ध चेहरे निवडण्यात आले आहेत. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचा सहभाग असलेल्या या जाहिरातीने सध्या अनेकांचं लक्ष वेधले आहे.

विविध संकल्पनांच्या आधारे जाहिराती करण्यावर भर देणाऱ्या ‘स्टार’ समूहातर्फे आणखी एक नवा प्रयोग करण्यात आला आहे. ‘स्टार भारत’ या वाहिनीच्या प्रसिद्धीसाठी ही जाहिरात करण्यात आली असून, ‘भुला दे डर, कुछ अलग कर’ हे ब्रीदवाक्य प्रत्ययकारीपणे पडद्यावर मांडण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे महेंद्रसिंह धोनी आणि अजय देवगण यांनी जाहिरातीमध्ये त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग सांगितले आहेत.

आपल्या मनातील भीती, दडपण यांच्यावर मात करत स्वप्नपूर्तीच्या दिशेने केलेली वाटचाल, याचं चित्रण जाहिरातीमध्ये करण्यात आलं आहे.
जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये पहिल्या चित्रपटामधील ‘तो’ बाईक स्टंट करताना आपल्याला फार भीती वाटली होती, असं सांगत अजय देवगण त्याच्या मनातील गोष्ट सर्वांसमोर मांडतोय. तर, धोनीसुद्धा चांगली नोकरी सोडून क्रिकेटर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा निर्णय घेतला तेव्हा आपल्याला फार भीती वाटली होती असं सांगताना दिसतोय.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

या अनोख्या उपक्रमामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजचासुद्धा सहभाग आहे. त्यामुळे भीतीवर मात करण्यातासाठी या प्रसिद्ध व्यक्तींच्या अनुभवांची इतरांना मदतच होत आहे, असं म्हणायला हरकत नाही. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘स्टार भारत’ या ब्रॅण्डची ही जाहिरात प्रसारित होणार आहे. ‘स्टार’ समूहाचा कला विभाग आणि ‘लिओ बर्नेट’ या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने जाहिरात आणखी प्रभावी करण्यात आली आहे.

प्रत्येकाच्याच आयुष्यात काही अडचणी येतात आणि त्यासोबतच येते ती म्हणते भीती. त्यामुळे आपल्या वाटांमध्ये भीतीमुळे येणारे हे अडथळे दूर करुनच स्वप्न पूर्ण करण्यासाठीची महत्त्वांकांक्षा ठेवा असा छुपा संदेश या जाहीरातीतून देण्यात येत आहे.