‘न्यूटन’ या चित्रपटाचीच सध्या सर्वत्र चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. २०१८ मध्ये होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ‘न्यूटन’ या चित्रपटाचं नाव पुढे करण्यात आलं आहे. अमित मसुरकर दिग्दर्शित आणि ‘दृश्यम फिल्म्स’ आणि ‘कलर यल्लो प्रॉडक्शन’ यांची निर्मिती असलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसत असून, त्याला तितक्याच तगड्या सहकलाकारांची साथ मिळाली आहे.

पंकज त्रिपाठी, अंजली पाटील, रघुबीर यादव आणि संजय मिश्रा यांच्या अफलातून अभिनयात सजलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. ‘न्यूटन’चा ऑस्करच्या शर्यतीत प्रवेश होणं ही बाब चित्रपटाच्या टीमसाठी आणि राजकुमारच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. पण, या चित्रपटाचा प्रवास इतका सोपा नव्हता. कारण त्याच्यापुढे आव्हान होतं ते म्हणजे बिग बजेट ‘बाहुबली २’ या चित्रपटाचं.

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ या चित्रपटाला मिळालेलं यश आणि एकंदर कथानक पाहता ऑस्करसाठी त्याला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण, निवड समितीने मात्र भव्यतेचं प्रतिक असलेल्या ‘बाहुबली २’ला प्राधान्य न देता ‘न्यूटन’ला पसंती दिल्याचं वृत्त ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण…

निवड समितीशी संबंधित एका व्यक्तीने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ऑस्कर पुरस्कारांसाठी विविध भाषांमधील २६ चित्रपटांचे प्रवेश आले होते. त्यामध्ये हिंदी भाषेतील १२, मराठी भाषेतील ५, तेलगु भाषेतील ५ अशा चित्रपटांचा समावेश होता. त्याशिवाय कन्नड, मल्ल्याळम आणि बंगाली भाषांमधील चित्रपटही या शर्यतीत होते. या सर्व चित्रपटांमध्ये बाजी मारली ती म्हणजे ‘न्यूटन’ने. या चित्रपटाचा सर्व दृष्टीकोनातून विचार करण्यात आला असून त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘न्यूटन’च्या वाट्याला आलेलं हे यश पाहून राजकुमार रावही फार आनंदात असून, चित्रपटाच्या टीममध्येही आनंदाचं वातावरण आहे.