सलमान खानचं नाव आणि त्याची कारकीर्द अभिनय क्षेत्रात गाजत असली तरीही अभिनयासोबतच तो विविध कलांमध्येही पारंगत आहे. त्याची गायनकला तर आपण जाणतोच. गायनासोबतच तो एक चांगला चित्रकारही आहे. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आपल्या अभिनयाने हसू आणि रडू आणणारा सलमान त्याच्या कुंचल्यातून कॅनव्हासवर सुरेख चित्रही रेखाटतो. मुख्य म्हणजे आपल्या भावना सहसा सर्वांसमोर व्यक्त न करणाऱ्या सलमानने एका चित्रातून या भावनानां वाट मोकळी करुन दिली आहे. येशू ख्रिस्ताच्या चित्रातून त्याने कलेचा सुंदर नमुना सादर केला आहे.

कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या सेटवर दबंग खानने हे चित्र साकारलंय. मुख्य म्हणजे त्याचं हे चित्र पाहून अनेकजणांना आश्चर्याचा धक्काच बसला. काहीजणांना तर त्याच्या या कलेबद्दल माहितीच नव्हती. त्यामुळे चित्रकार सलमान अनेकांसाठी नवा होता. चित्रांतून व्यक्त होण्याची ही कला सलमानने त्याच्या कारावासातील दिवसांत आणखी खुलवली. चौकटीबाहेर जात अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग करण्याकडे त्याचा जास्त कल आहे.

salman-painting-759

कुंचल्यातील रंग एकत्र करत नव्या रंगातून बुद्ध, गणपती, शंकर, येशू ख्रिस्ताची चित्र रेखाटण्यावर त्याचा जास्त भर आहे. त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर अशा बऱ्याच पेंटिग्स ठेवण्यात आल्या आहेत. इतकच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील काही जवळच्या मित्रांना सलमानने त्याची ही चित्र भेट स्वरुपातही दिली आहेत, काही चित्रांचा लिलाव करुन त्यातून मिळालेले पैसे त्याने स्वयंसेवी संस्थांनाही देऊ केले आहेत. असा हा भाईजान सलमान लवकरच ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा: त्या दिवशी सलमानचं कुटुंब त्याला कारागृहात भेटायला गेलं आणि…

सलमा खान आणि सलमान खान यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटामधून सोहेल खान आणि सलमान खान सात वर्षांनंतर स्क्रीन शेअर करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यातून सोहेल आणि सलमान या दोन्ही भावांमधील सुरेख नात्याची झलक पाहायला मिळाली होती. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

वाचा: ..म्हणून ‘ट्युबलाइट’च्या ट्रेलरपेक्षा सलमान- अहिलचा व्हिडिओ होतोय व्हायरल