कलाकार फक्त अभिनय क्षेत्रातच कार्यरत असतात असा जर तुमचा समज असेल तर तसं नाहीये. अभिनय क्षेत्रासोबतच कलाकारांचं इतरही मार्गांनी अर्थार्जन सुरु असतं. आता सलमान खानचंच उदाहरण घ्या ना. विविध मार्गांनी सलमानचं अर्थार्जन सुरुच असतं. ‘डीएनए’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला सलमान त्याच्या एका प्रॉपर्टीमधून दरमहा ८० लाख रुपये कमवणार असल्याचं म्हटलं जात आहे.

वांद्रे येथील लिंकिंग रोडजवळील सलमानची २ हजार १४० चौरस फुटांची प्रॉपर्टी आहे. सध्याच्या घडीला ती प्रॉपर्टी ‘फ्युचर ग्रुप’ला भाडेतत्वावर दिली असून, ती ‘बिग बाजार’च्या मालकीची आहे. याच प्रॉपर्टीमधून सलमानला दरमहा ८० लाख रुपये मिळणार असून, ६० महिन्यांसाठी ही जागा भाडेतत्वावर देण्यात आली आहे. पहिल्या पाच वर्षांसाठी या जागेवर ८० लाख रुपयांचं भाडं असून त्यानंतर या जागेच्या भाड्यात वाढ करण्यात येणार असून ८९.६ लाख रुपये इतकं भाडं आकारलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच या जागेची गणितं मांडण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : …म्हणून कटप्पाच्या मुलीने लिहिलं मोदींना

भाईजान सलमानच्या या प्रॉपर्टीमध्ये ६०९.३५ चौरस फुटांचं बेसमेंट, ३७३.२१ चौरस फुटांचा तळमजला, ५७९.६१ चौरस फुटांचा पहिला मजला आणि ५७८.५४ चौरस फुटांचा दुसरा मजला अशी एकंदर प्रॉपर्टी आहे. या इमारतीचं नाव अद्यापही समोर आलं नाहीये. १२० कोटी रुपयांना सलमानने ही प्रॉपर्टी २०१२ मध्ये विकत घेतली होती. या जागेवर नवं बांधकाम होण्याआधी इथे जवळपास  १६ फ्लॅट्सची एक सोसायटी होती. दरम्यान, सलमानशी संलग्न कोणत्याही व्यक्तीकडून या डीलबद्दलची माहिती देण्यात आली नाहीये.