‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकू शकला नाहीये. पण, ही बाब फार मनावर न घेता अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या श्रीलंकेमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावरही तिने बरेच फोटोही पोस्ट केले आहेत. मुख्य म्हणजे अनुष्का Anushka Sharma श्रीलंकेत एकटीच सुट्ट्यांचा आनंद घेत नसून विराट कोहलीची Virat Kohli साथ तिला लाभली आहे. नुकतंच वृक्षारोपण करतानाचा या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सर्वांनाच त्यांच्या सिक्रेट व्हेकेशनबद्दल माहिती मिळाली. इतकं असतानाही नेटिझन्सच्या नजरेतून विरुष्काच्या (विराट- अनुष्काच्या) या व्हेकेशनवरही खिल्ली उडवण्यात आली आहे.

विराट आणि अनुष्काने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले फोटो पाहता ते एकाच ठिकणी असल्याचं लक्षात येत आहे. पण, एकाच ठिकाणी असूनही या दोघांनी एकत्र फोटो न काढल्यामुळेच त्यांची खिल्ली उडवण्यात आली. ‘अ डे वेल स्पेंट’ असं कॅप्शन देत अनुष्काने काही दिवसांपूर्वी एक फोटो पोस्ट केला होता. अर्थात तिचा हा दिवस कोणामुळे चांगला गेला हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकांनीच तिच्या चेहऱ्यावरील आनंदाचं कारण हेरलं होतं. एकाच ठिकाणी असून या दोघांनीही नेमका एकत्र फोटो का काढला नाही आणि फोटो काढला असल्यास तो पोस्ट का केला नाही असे प्रश्न उपस्थित करत विरुष्काची खिल्ली उडवली जात आहे.

अनुष्का आणि विराट सध्या श्रीलंकेत एकमेकांसोबत वेळ व्यतीत करत असून, नुकतंच एका वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते. वृक्षारोपण करतानाचे त्यांचे काही फोटो क्षणार्धातच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात नऊ वर्षांची कारकिर्द पूर्ण केल्यामुळे हा आनंद त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. दरम्यान, विरुष्काचं प्रेमप्रकरण आता काही लपून राहण्याजोगं राहिलं नाहीये. बऱ्याच ठिकाणी हे दोघंही एकत्र जातात. पण, प्रसारमाध्यमं आणि गर्दीपासून मात्र ते दूर राहण्यालाच प्राधान्य देतात हे सुद्धा तितकच खरं.

PHOTOS : विराट-अनुष्काने असा साजरा केला आनंद